रशियाकडून भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा होणार

Russia starts delivery of second S-400 missile system to India : रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू आहे. ही लढाई सुरू असली तरी रशियाकडून भारताला करारानुसार शस्त्रपुरवठा सुरळीत सुरू आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार रशियाकडून एप्रिल (एप्रिल २०२२) महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनशी संबंधित महत्त्वाच्या यंत्रणेचा पुरवठा होईल.

Russia starts delivery of second S-400 missile system to India
रशियाकडून भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रशियाकडून भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा होणार
  • एप्रिल (एप्रिल २०२२) महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनशी संबंधित महत्त्वाच्या यंत्रणेचा पुरवठा होईल
  • नंतर भारत S-400ची दुसरी स्क्वाड्रन देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्याचे काम सुरू करेल

Russia starts delivery of second S-400 missile system to India : नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू आहे. ही लढाई सुरू असली तरी रशियाकडून भारताला करारानुसार शस्त्रपुरवठा सुरळीत सुरू आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार रशियाकडून भारताला S-400च्या (एस-४००) दुसऱ्या स्क्वाड्रनचा पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू आहे. एप्रिल (एप्रिल २०२२) महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला S-400च्या दुसऱ्या स्क्वाड्रनशी संबंधित महत्त्वाच्या यंत्रणेचा पुरवठा होईल. यानंतर भारत S-400ची दुसरी स्क्वाड्रन देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्याचे काम सुरू करेल. 

भारताने पहिली S-400ची स्क्वाड्रन भारत-पाकिस्तान सीमेवर पंजाबमध्ये सज्ज ठेवली आहे. रशियाकडून मिळालेल्या S-400मुळे पाकिस्तानला भारतावर हवाई हल्ला (लढाऊ विमान, क्षेपणास्त्र, अण्वस्त्र यांच्याद्वारे हवाई हल्ला) करणे कठीण झाले आहे. भारताची हवाई सुरक्षा आणखी सक्षम झाली आहे. 

भारताने रशियासोबत ऑक्टोबर २०१८ मध्ये पाच S-400 स्क्वाड्रन खरेदी करण्यासाठी पाच अब्ज डॉलरचा करार केला आहे. या करारांतर्गत S-400ची पहिली स्क्वाड्रन डिसेंबर २०२१ मध्ये भारतात दाखल झाली. दुसरी स्क्वाड्रन भारतात टप्प्याटप्प्याने येत आहे.

रशियाने तयार केलेली S-400 ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या मदतीने ४० ते ४०० किमी. पर्यंतच्या टप्प्यात हवाई हल्ला करणे तसेच शत्रूचे हवाई हल्ले आकाशातच नष्ट करणे शक्य आहे. प्रचंड वेग, आधुनिक रडार यामुळे S-400 अतिशय प्रभावी हवाई संरक्षण यंत्रणा झाली आहे. भारताला S-400मुळे पाकिस्तानच्या विमानांच्या आणि क्षेपणास्त्रांच्या हालचाली उड्डाण होताच लक्षात येतात. यानंतर रडारद्वारे संबंधित विमानाचा वा क्षेपणास्त्राचा पाठलाग करणे आणि धोका जाणवल्यास ते नष्ट करण्याची क्षमता भारतातील S-400मध्ये आहे.

अलिकडेच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. रशियाकडून केलेल्या आयातीसाठी भारत डॉलर ऐवजी रुपया हे भारतीय चलन देऊ शकेल का तसेच भारताकडून खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांवर रशिया रुबलच्या (रशियाचे चलन) माध्यमातून पैसे देऊ शकेल का या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. भारताची यूपीआय पेमेंट सिस्टिम आणि रशिया वापरत असलेली पेमेंट सिस्टिम यांना एकमेकांशी जोडून थेट ऑनलाइन व्यवहार करता येईल का, या मुद्यावरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. बोलणी प्रगतीपथावर आहेत. रशिया आणि भारत यांच्यात युक्रेन संकट, अफगाणिस्तान, इराण तसेच परस्पर सहकार्याशी संबंधित मुद्यांवरही सविस्तर चर्चा झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी