Russia-Ukraine conflict hampers Mars mission : मॉस्को : रशिया-युक्रेन संघर्षामुळे एक मंगळ ग्रहाशी संबंधित अंतराळ मोहीम रखडली आहे. ही मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी आणि रशिया संयुक्तपणे आखत होते. या मोहिमेतून बाहेर पडण्याचा निर्णय युरोपियन स्पेस एजन्सीने घेतला आहे.
दर दोन वर्षांनी मंगळ ग्रह पृथ्वी जवळून पुढे जात सुर्याला प्रदक्षिणा घालतो. हा योग २०२४ मध्येही येणार होता. युरोपियन स्पेस एजन्सी आणि रशिया संयुक्तपणे २०२४ मध्ये मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी मोहीम आखत होते. पण रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाला. यानंतर अमेरिका तसेच युरोपियन युनियनने रशियावर अनेक निर्बंध लादले. पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीत युरोपियन स्पेस एजन्सीच्या मुख्य काउन्सिलने (मुख्य नियंत्रक समिती) रशियासोबतच्या मंगळ मोहिमेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या मोहिमेत मंगळ ग्रहावर सध्या जीवन आहे का आणि असल्यास कोणत्या टप्प्यावर आहे?, मंगळ ग्रहावर याआधी जीवन अस्तित्वात होते का आणि कशा स्वरुपात होते?, मंगळ ग्रहावर भविष्यात जीवनाचे अस्तित्व निर्माण होण्याची शक्यता आहे की नाही?; अशा स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होणार होता.
नासाचे पर्सवेरेंस रोव्हर आणि चीनचे जुरोंग (चिनी अग्निदेवतेचे नाव) मंगळ ग्रहावरील जीवनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत. ज्या भागात नासा आणि चीनच्या मोहिमा सुरू आहेत त्या भागापासून दूर असलेल्या वेगळ्या भागात युरोपियन स्पेस एजन्सी आणि रशिया संयुक्तपणे जीवनाचा शोध घेणार होते. पण कोरोना संकट सुरू झाल्यामुळे ही मोहीम काही वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली. मोहीम सप्टेंबर २०२२ मध्ये कझाकिस्तानमधून उड्डाण करून सुरू करण्याचा निर्णय झाला. या मोहिमेसाठी रशियाचे रॉकेट तयार होत होते. पण रशिया-युक्रेन संघर्षाचे कारण पुढे करून युरोपियन स्पेस एजन्सीने मोहिमेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन मोहिमांमध्ये राजकारण आणू नये, असे आधी पाश्चात्य देश जगाला सांगत होते. पण रशियाची कोंडी करण्यासाठी पाश्चात्य देशांच्या युरोपियन स्पेस एजन्सी रशियासोबतची मोहीम एकतर्फी स्थगित केली आहे. रशियाने केलेल्या कारवाईमुळे मारली गेलेली माणसं, निर्माण झालेले मानवी संकट याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो. रशियाची कोंडी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देतो; असे युरोपियन स्पेस एजन्सीने जाहीर केले.