कीव्ह : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार बॉम्ब (Bomb) वर्षावानंतर, रशियाच्या(Russia) फौजा युक्रेनच्या (Ukraine) खारकीव्ह शहरातून माघार घेत आहेत. रशियाकडून आता पुरवठ्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत असून, दन्त्येस्क प्रांताच्या पूर्वेमध्ये बॉम्बफेक आणि हवाई हल्ले करत युक्रेनच्या लष्कराला उद्ध्वस्त करण्याची व्यूहरचना आखली आहे. दरम्यान या खारकीव्हमधील सहा गावांमध्ये लष्कराने ताबा मिळवला आहे.
खारकीव्ह हे युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसांमध्येच या शहरावर ताबा मिळवला होता. आता हे युद्ध नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे, असे सांगत युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी दीर्घकालीन युद्धाचे सुतोवाच केले. तर, रशियाला युक्रेनमधून हुसकावून लावण्यासाठी युक्रेनकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र हे युद्ध किती काळ चालेल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही, असे युक्रेनचे अध्यक्ष व्लाजिमिर झिल्येन्स्की यांनी म्हटले आहे. या युद्धाचा अंतिम निकाल युरोप आणि मित्रदेशांकडून कशी मदत होते, यावर अवलंबून असेल, असेही त्यांनी नमूद केले.
पूर्वेतील डोनबास प्रदेश ताब्यात घेण्याचा निर्णय रशियाने घेतला असला, तरीही ही मोहीम रशियाला कठीण जात असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गावासाठी त्यांच्या लष्कराला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. तर, काही दिवसांमध्ये युक्रेनच्या लष्कराने सहा गावे परत मिळवली आहेत, असा दावा झिल्येन्स्की यांनी केला आहे. रशियाला या युद्धामध्ये आतापर्यंत कोणताही व्यूहरचनात्मक विजय मिळवता आलेला नाही, असे पाश्चिमात्य अधिकाऱ्याने सांगितले आहे.
रशियाला पूर्व युक्रेनमधील कारवाईसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा एक तरंगता पूल उडवून देण्यात युक्रेनला यश आले. बिलोहोरव्हिका येथील सिव्हरस्की डोनेट्स नदीवर हा पूल होता. या हल्ल्यामध्ये रशियाच्या लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. किमान ७३ रणगाडे आणि अन्य लष्करी वाहने नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, पूर्व युक्रेनमधील कारवाईच्या दृष्टीने या पुलाला सामरिक महत्त्व होते. ब्रिटनच्या गुप्तचर विभागानेही या कारवाईला दुजोरा दिला आहे.