सांगली: सांगली जिल्ह्यच्या जत तालुक्यातील मूळचे तिघेजण ओमान देशातील समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी घडल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले असल्याचं समोर आलं आहे. अद्याप समुद्रात त्यांचा शोध लागलेला नाही.
मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी यांच्यासह दुबई येथे ते वास्तव्यास होते. बकरी ईदची सुट्टी असल्याने शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबईजवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते.
तेथेच ते समुद्र किनारी गेले होते. ते जेव्हा समुद्रकिनारी पोहचले तेव्हा समुद्र फारच खवळलेला होता आणि उंचच उंच लाटा उसळत होत्या. यावेळी शशिकांत हे आपल्या दोन मुलांसह सुमद्र किनारी लाटांचा आनंद घेत होते मात्र, एक अतिप्रचंड लाट उसळली ज्यामध्ये किनाऱ्यावर असलेल्या शशिकांत आणि त्यांच्या दोन्ही मुलांना आत ओढून घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेला शशिकांत यांचे भाऊ राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शशिकांत म्हणाणे हे दुबईत होते. मूळचे सांगलीतील जतमधील हे संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून दुबईत राहत होतं. दरवेळेस ते सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जवळच्या ठिकाणी जात असत. यावेळी त्यांनी ओमानला जायचं ठरवलं पण दुर्दैवाने ही त्यांची अखेरची सहल ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत यांची पत्नी सारिका या देखील पतीसोबत सहलीला गेल्या होत्या. जेव्हा ही दुर्घटना झाली त्यावेळी त्या देखील किनाऱ्यावरच होत्या. आणि त्यांच्या डोळ्यादेखतच पती आणि पोटची दोन मुलं भर समुद्रात बुडाले. या संपूर्ण घटनेमुळे जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
'तो' व्हिडिओ ओमनामधील?
दरम्यान, काल एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भली मोठी लाट काही जणांना ओढून खोल समुद्रात घेऊन जात असल्याचं दिसतं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो ओमानमधील असल्याचं सांगण्यात येत आहेत. मात्र, टाइम्स नाऊ मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
या व्हिडिओबाबत असंही सांगण्यात येत आहे की, हा ओमानच्या सालाह अल मुघसैल येथील आहे. तिथल्या समुद्र किनारी तुफान उसळणाऱ्या लाटांमुळे आठ भारतीय नागरिक हे खोल समुद्रात बुडाले. ज्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आलं. मात्र, पाच जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
अनेकदा काही जण अतिउत्साहीपणे समुद्र किनाऱ्यावर अजिबात कोणतीही काळजी न घेता जातात. ज्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मागील वर्षी गोव्यात देखील खवळलेल्या समुद्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. लाटांचा अंदाज न आलेल्याने तो किनाऱ्यावरील खडकावर बसला होता. पण एका महाकाय लाटेत तो बुडला.