Satara NCP: राष्ट्रवादीला धक्का; रामराजे नाईक-निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर?

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 18, 2019 | 16:29 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Satara NCP: विधानपरिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. रामराजे नाईक-निंबाळकर थेट पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sharad Pawar file photo
शरद पवार यांना आणखी एक राजकीय धक्का   |  फोटो सौजन्य: BCCL

सातारा : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विधानपरिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. त्यानंतर आता रामराजे नाईक-निंबाळकर थेट पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या स्थानिक गटातटांमध्ये नाईक-निंबाळकर गटाला इतर नेत्यांनी घेरल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढून आपला गट टिकवण्यासाठी आता कोणत्यातरी सत्ताधारी पक्षाची कास धरणे आवश्यक असल्यामुळेच रामराजे सध्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे मानले जात आहे. येत्या काही दिवसांत ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मुंबईतील बैठकीतच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.

पाण्यावरून वाद पेटला

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय समीकरणं बदलली. माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह निंबाळकर यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यांना काँग्रेस आमदार जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांची साथ मिळाली. सध्या फटलणच्या राजकारणात राजे गट अडचणीत आला आहे. रणजीतसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे रामराजे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळं भविष्यात राजे गट टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आधार घेण्याचा रामराजे यांचा प्रयत्न आहे. सध्या रामराजे नाईक-निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. पण, विधानपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ घटल्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजप त्यांची केव्हाही उचलबांगडी करू शकतात. त्यामुळे पद टिकवून ठेवण्याचं आव्हानही रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यापुढं आहे. नीरा कालव्यातून बारामतीला नियमबाह्य पाणी दिल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यावरूनच कृष्णा खोरे खात्याचे मंत्री असताना रामराजे यांनी फलटण आणि माळशिरस तालुक्यातील जनतेची फसवणूक केली. जनतेला पाणी पोहचवलं नाही, असा आरोप खासदार रणजीतसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी केला आहे. खासदार उदयनराजे यांनी त्यांचीच री ओढल्याने रामराजे यांनी खासदार उदयनराजे यांना आवरा, असे सांगत पक्षाध्यक्षांकडे तक्रार केली. पवार यांनी दोन्ही नेत्यांसमवेत बैठक बोलवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला.

मी फक्त निमित्त : उदयनराजे

खासदार उदयनराजे यांना आवरा नाही तर, आम्ही तरी पक्षातून बाहेर पडतो, असा इशारा रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला होता. बैठकीनंतर पत्रकारांनशी बोलाताना खासदार उदयनराजे यांनी रामराजे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ‘रामराजे यांना पक्ष सोडून जायचेच आहे. फक्त ते माझे निमित्त पुढे करत आहेत,’ असा टोला खासदार उदयनराजे यांनी लगावला आहे. सातारा जिल्ह्यात रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील पक्षांतर्गत संघर्ष अनेक वर्षांपासूनचा आहे. त्या संघर्षाचा शेवट रामराजे यांच्या शिवसेना प्रवेशाने होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Satara NCP: राष्ट्रवादीला धक्का; रामराजे नाईक-निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर? Description: Satara NCP: विधानपरिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. रामराजे नाईक-निंबाळकर थेट पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles