मायक्रोसॉफ्टचे सीईओ, सत्य नाडेला झाले कंपनीचे चेअरमन, नेमकं काय चाललंय मायक्रोसॉफ्टमध्ये?

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सत्य नाडेला (Satya Nadella) यांचे नामांकन कंपनीच्या चेअरमनपदासाठी (Chairman of Microsoft) करण्यात आले आहे.

Satya Nadella
सत्य नाडेलांची घोडदौड 

थोडं पण कामाचं

  • सत्य नाडेलांनी केला मायक्रोसॉफ्टचा विस्तार
  • बिल गेट्सची मायक्रोसॉफ्टमधून पीछेहाट
  • मायक्रोसॉफ्टमधील फेरबदल

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सत्य नाडेला (Satya Nadella) यांचे नामांकन कंपनीच्या चेअरमनपदासाठी (Chairman of Microsoft) करण्यात आले आहे. कंपनीचे विद्यमान चेअरमन जॉन थॉम्पसन यांच्या जागी आता सत्य नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे चेअरमन होणार आहेत. मायक्रोसॉफ्टची (Microsoft) स्थापना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स (Bill Gates) यांनी केली होती. मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सत्य नाडेला यांची चेअरमनपदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव बुधवारी सादर केला आहे. (Microsoft CEO Satya Nadella to become new Chairman of company)

सत्य नाडेलांनी केला मायक्रोसॉफ्टचा विस्तार

२०१४ मध्ये स्टीव्ह बाल्मर यांच्या जागी सत्य नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. सत्य नाडेला यांची मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार करण्यात मोठी भूमिका बजावली होती. यामध्ये लिंक्डइन, न्युआन्स कम्युनिकेशन्स आणि झेनिमॅक्स या कंपन्यांच्या अब्जावधी डॉलर खर्चून केलेल्या अधिग्रहणांचाही समावेश आहे. जॉन थॉम्पसन यांनी २०१४मध्ये मायक्रोसॉफ्टच्या चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळली होती. कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी चेअरमनपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर थॉम्पसन यांची त्याजागी नियुक्ती झाली होती. सत्य नाडेला मायक्रोसॉफ्टचे चेअरमन झाल्यानंतर थॉम्पसन हे कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत. 

बिल गेट्सची मायक्रोसॉफ्टमधून पीछेहाट

बिल गेट्स वर्षभरापूर्वीच कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या वरिष्ठ पदांमध्ये हे फेरफार होत आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थापैकी एक असलेल्या  बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन या संस्थेच्या कामकाजावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळातून बाहेर पडत असल्याचे बिल गेट्स यांनी सांगितले होते. मायक्रोसॉफ्टने मागील महिन्यात सांगितले होते की कंपनीने बिल गेट्स यांच्या विरोधात एक चौकशी केली होती. या चौकशीत बिल गेट्स यांचे कंपनीच्या एका महिला कर्मचाऱ्याबरोबर जवळपास २० वर्षे संबंध होते. २०१९ मध्ये हे प्रकरण समोर आले होते. बिल गेट्स यांचे या महिला कर्मचाऱ्याशी रोमॅंटिक संबंध बनवण्याची इच्छा होती असा खुलासा २०१९मध्ये झाला होता. 

मायक्रोसॉफ्टमधून बिल गेट्स यांची हकालपट्टी करायची की नाही यावर संचालक मंडळाने काही निर्णय घेतला आहे का यावर मायक्रोसॉफ्टकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मायक्रोसॉफ्टने ५६ सेंट्स प्रति शेअरचा लाभांश ९ सप्टेंबरला याधीच जाहीर केलेला आहे. 

बिल गेट्सच्या आयुष्यातील घडामोडी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स  (Bill Gates) यांचा अलीकडेच पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates)यांच्याबरोबरचा आपला २७ वर्षांचा संसार मोडला आहे. या दांपत्याच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला होता.  बिल गेट्स यांच्याकडून घटस्फोट मिळाल्यानंतर मेलिंडा गेट्स अब्जाधीश झाल्या आहेत. मेलिंडाकडे दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम आली आहे. याशिवाय मेलिंडा यांना बिल गेट्स यांनी स्थापन केलेली सर्वात मोठी कंपनी कॅक्सेड इन्व्हेस्टमेंटमध्येदेखील (Cascade Investment) मोठी भागीदारी मिळाली आहे. घटस्फोटानंतरही बिल गेट्स आणि मेलिंडा, हे दोघे बिल अॅंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम करणार आहेत. बिल अॅंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे कार्यालय सध्या सिएटल येथे आहे. २०१९ मध्ये  गेट्स फाऊंडेशनची एकूण संपत्ती ४३.३ अब्ज डॉलर इतकी होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी