Sideways Skyscraper : सौदी अरेबिया जगातले आठवे आश्चर्य विकसित करत आहे. यासाठी सौदीने वाळवंटात १२० किमी लांबी आणि १६०० फूट उंचीच्या दोन इमारती बांधण्याची योजना तयार केली आहे. या दोन इमारतींमध्ये ५० लाख नागरिक राहतील असे सौदीचे म्हणणे आहे. सौदीने या योजनेला 'मिरर लाइन' असे नाव दिले आहे. दोन्ही इमारतींच्या बाहेरच्या बाजुला महाकाय आरशांचे आवरण असेल. योजनेचे आकारमान मॅसाच्युसेट्स एवढे मोठे आणि एम्पायर स्टेट इमारतीपेक्षा उंच असेल.
द्रौपदी मुर्मू सोमवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार, मुर्मू यांचा दिवसभराचा कार्यक्रम
सौदीचे राजे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी जानेवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा जाहीरपणे या योजनेची माहिती दिली. इजिप्तमधील पिरॅमिड हे एक जागतिक आश्चर्य आहे. याच पद्धतीने नवे जागतिक आश्चर्य विकसित करण्यासाठी सौदी महाकाय इमारतींची योजना राबवणार आहे. या योजनेवर ७६६ अब्ज रुपये एवढा खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण या योजनेविषी काही जणांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोना संकटानंतर मर्यादीत जागेत लाखो नागरिकांच्या राहण्याची सोय करणे योग्य आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
साईडवे स्कायस्क्रॅपर 'मिरर लाईन' निओम (NEOM) नावाच्या वाळवंटातील शहराचा भाग असतील. यात १६०० फूट उंचीच्या दोन इमारती एकमेकांना समांतर अशा बांधल्या जातील. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान ५० वर्षांचा कालावधी लागणार आहे. पृथ्वीच्या वक्रतेचा अंदाज घेऊन इमारतीच्या स्थैर्यासाठी अभियंत्यांना त्यांच्या कौशल्याचा कस लावावा लागणार आहे. या इमारतींच्या आतमध्ये विशेष हायस्पीड ट्रेन असणार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने या महाकाय योजनेची माहिती देणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. सौदीच्या पश्चिमेच्या अकाबा खाडीजवळच्या एका पर्वतरांगेपासून वाळवंटापर्यंत योजनेचा विस्तार असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात नमूद आहे.
इमारतीत सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात होईल. इमारतीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी विशेष व्यवस्था असूनही किमान २० मिनिटे लागतील. इमारतीच्याआतमध्ये बागा, शेती आणि घरे अशी अनोखी व्यवस्था असेल. इमारतीचे सबस्क्रिप्शन घेणाऱ्यास या इमारतीत दररोज किमान तीन वेळा जेवणाचे पदार्थ मिळतील. इमारतीचे स्वतःचे एक हजार फूट उंचीवर एक महाकाय स्टेडियम असेल. प्रदूषणमुक्त अशी ही इमारत असेल. इमारतीत निर्माण होणाऱ्या उर्जेचा आणि प्रदूषण नियंत्रण उपायांचा सकारात्मक परिणाम होईल आणि इमारत १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल.
साईडवे स्कायस्क्रॅपर 'मिरर लाईन'मध्ये अनेक व्यावसायिक आस्थापने असतील. इमारतीच्या माध्यमातून सौदीत मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची योजना आहे. ज्या भागात इमारत बांधली जाणार आहे त्या भागात सध्या तुरळक नागरी वस्ती आहे. पण दोन्ही इमारती तयार झाल्यानंतर चित्र बदलेल असा विश्वास अभियंते व्यक्त करत आहेत.
सौदी अरेबिया देशाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न करत आहे. जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा प्रकल्प हा त्याच धोरणाचा एक भाग म्हणून राबविला जाणार आहे.