Save Tiger: ‘एक था टायगर’ नव्हे, आता भारतात ‘टायगर जिंदा है’

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 29, 2019 | 16:29 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Save Tiger: भारताने २०२२पर्यंत देशातील वाघ दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले होते. त्याला यश येत असून, चार वर्षे आधीच भारतातील वाघांची संख्या जवळपास दुपटीपर्यंत पोहचल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

international tiger day
भारतात वाघांची संख्या वाढली   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतात गेल्या नऊ वर्षांत वाघांची संख्या लक्षणीयरित्या वाढली
  • भारतातील वाघांची संख्या पोहोचली ३ हजारांच्या आसपास
  • आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती
  • भारतातील वाघ १४०० वरून आता तीन हजारांवर

नवी दिल्ली: भारतातीलच नव्हे, तर जगभरातील वन्यजीव प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात वाघांची संख्या वाढली आहे. ही संख्या थोडी थोडकी वाढली नसून लक्षणीयरित्या वाढली आहे. सध्या देशात २ हजार ९६७ वाघ असल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे जवळपास नऊ वर्षांपूर्वी भारतातील वाघांची संख्या हा जगभरात वन्यजीव रक्षकांच्या चिंतेचा विषय होता. त्यामुळे भारताने २०२२पर्यंत देशातील वाघ दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले होते. त्याला यश येत असून, चार वर्षे आधीच भारतातील वाघांची संख्या जवळपास दुपटीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे देशभरातून याविषयी समाधान व्यक्त होत आहे. तसेच या कामगिरीमुळे जागतिक पातळीवर भारताविषयीचा आदरही वाढणार आहे. आता भारत वाघांसाठी सुरक्षित भूमी असल्याचं मानलं जाऊ लागलं आहे.

तमिळनाडूचा प्रकल्प सर्वोत्तम

आज जागतिक व्याघ्र दिनाच्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल २०१८' प्रसिद्ध करण्यात आला. त्यात देशातील वाघांच्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, भारतात जवळपास तीन हजारांवर वाघ असून, वाघांसाठी भारत जगातील सर्वाधिक सुरक्षित देश असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमात देशातील व्याघ्र प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यात तमिळनाडूतील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाने सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्पाचा पुरस्कार पटकावला.


भारतात २०१०मध्ये केवळ १७०६ वाघ शिल्लक राहिले होते. त्यावेळी जागतिक पातळीवर भारतातील वाघांच्या घटत्या संख्येवरून चिंता व्यक्त करण्यात आली होती. वाघांच्या चामड्याची, नखांची तस्करी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळेच वाघांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत होते. त्यानंतर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत संख्या वाढल्याचे दिसले होते. त्यावेळी देशात २ हजार २२६ वाघ होते.

‘आपल्याला इथेच थांबायचे नाही’

व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारतातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे टार्गेट २०२२पर्यंत ठेवण्यात आले होते. पण, आपण चार वर्षे आधीच हे टार्गेट अॅचिव्ह केले आहे. भारतीयांना त्यांचे लक्ष्य गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’ देशातील वाघांची घटती संख्या भारताच्या गौरवासाठीही चिंतेचा विषय होता. कारण, वाघांची संख्या पंधरा वर्षांपूर्वी १४००वर आली होती. पण, आता जगातील तीन चतुर्थांश वाघ भारतात आहेत. वाघ वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी कोतुक केले. ते म्हणाले, ‘या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला माझे हेच सांगणे आहे की, ही मोहीम ‘एक था टायगर’पासून सुरू झाली आणि आता ‘टायगर जिंदा है’पर्यंत पोहोचली आहे. आता ही मोहीम इथेच थांबवायची नाही. व्याघ्र संरक्षणासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांचा आता आणखी विस्तार करण्याची गरज आहे. २०१४ मध्ये भारतात ६९२ व्याघ्र संरक्षण प्रकल्प होते. आता ते ८६० झाले आहेत. आपल्याला इथेच थांबायचे नाही’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी