सैतानी वृत्तीने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या, भारतातील ६ सीरियल किलर्स प्रकरणे, भीती आणि थरकाप

भारताच्या गुन्हेगारी जगतात (Criminal history) याहीपेक्षा भयानक, थरकाप उडवणाऱ्या आणि आजही मनामध्ये भीती निर्माण करणारी काही सीरियल किलर्सची प्रकरणे झाली आहेत. या गुन्ह्यांनी त्यावेळेस संपूर्ण देशाला हादरवले होते

Serials Killers in India
भारतातील सीरियल किलर्स 

थोडं पण कामाचं

  • लोकांना हादरवून टाकणारी, दहशत निर्माण करणारी सीरियल किलिंगची प्रकरणे
  • भारतातील सर्वाधिक कुप्रसिद्ध असे सीरियल किलर्स
  • अनेक वर्षे दशके उलटून गेल्यानंतरही लोकांच्या मनात भीती निर्माण करणारे खतरनाक गुन्हे

नवी दिल्ली : Serials Killers in India:आपण अनेकवेळा चित्रपटात किंवा मालिकांमध्ये सीरियल किलर्सच्या (serial killers) कथा पाहतो. पडद्यावर या कथा आणि गुन्हे पाहतानादेखील आपल्या जीवाचा थरकाप होतो. मात्र भारताच्या गुन्हेगारी जगतात (Criminal history) याहीपेक्षा भयानक, थरकाप उडवणाऱ्या आणि आजही मनामध्ये भीती निर्माण करणारी काही सीरियल किलर्सची प्रकरणे (Famous serial killers) झाली आहेत. देशाच्या विविध भागात अशी प्रकरणे झाली आहेत. खरंतर या वास्तविक जगातील सीरियल किलर्सवरच चित्रपट (Movies) किंवा वेबसेरिजमधील (Web Series) कथा बेतलेल्या असतात. मात्र सर्वच कथा किंवा प्रकरणे सर्वसामान्यांना माहित असतात असे नाही. काही प्रकरणे मागील काही वर्षांमधील असल्याने ताजी आहेत तर काही बऱ्याच वर्षांपूर्वी घडून गेली असल्यामुळे विस्मृतीत गेली आहेत. अशाच भारतातील सर्वाधिक भयानक ६ सीरियल किलर्सच्या कथांना उजाळा देऊया. (Most dangerous serial killers in India)

१. रामन राघव -

भीती, दहशत आणि सीरियल किलर या शब्दांसाठी आजही रामन राघव हे पर्यायी नाव आहे. रामन राघव हा भारतातील पहिला प्रसिद्धीच्या झोतात आलेला सीरियल किलर होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. रामन राघव हा एक सिझोफ्रेनिक सीरियल किलर होता. त्याने २३ पेक्षा अधिक लोकांचा खून केला होता. रामन राघवला सायको रामन सुद्धा म्हटले जायचे. १९६० च्या दशकात मुंबईत रामन राघवने दहशत निर्माण केली होती. झोपटपट्टीत राहणाऱ्या गरिबांमध्ये त्याने भीती निर्माण केली होती. कारण त्याने केलेले बहुतांश खून हे अशाच वस्त्यांमधील होते. तो खून करण्यासाठी एका काठीचा वापर करायचा. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला सिझोफ्रेनिया असल्याचे उघड झाले होते. २३ खून केल्याचे त्याने कबुल केले होते. अर्थात त्याची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. १९९५ मध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

२. चार्ल्स शोभराज उर्फ बिकिनी किलर -

चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर या नावानेदेखील ओळखले जाते. भारतातील सर्वात ग्लॅमरस गुन्हेगार अशी त्याची ओळख आहे. त्याच्या गुन्हेगारीच्या सुरस कथा आजही चर्चिल्या जातात. भारतातील गुन्हेगारांमध्ये सर्वात तल्लख बुद्धिमत्तेचा आणि अत्यंत हुशार गुन्हेगार म्हणून चार्ल्स शोभराजचा उल्लेख होतो. त्याच्यावर १२ जणांच्या हत्येचा आरोप होता. प्रत्यक्षात चार्ल्स शोभराजने नेमके किती गुन्हे केले हे कधीच स्पष्ट झाले नाही. १९७५ ते १९७६ या काळात शोभराजने आग्नेय आशियातील विविध देशात १२ खून केले. शोभराज आधी महिलांचा खून करायचा आणि नंतर आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी त्यांच्याकडील पैसे, मौल्यवान चीजवस्तू लुटायचा. बिकिनी घातलेल्या दोन महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर त्याचे नाव बिकिनी किलर म्हणून कुप्रसिद्ध झाले होते. भारतात त्याला अटक केल्यानंतर १९७६ ते १९९७ या कालावधीत तो तुरुंगात होता. त्यानंतर तो बाहेर पडल्यानंतर त्याला २००४ मध्ये नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती.

३. देवेंद्र शर्मा -

२००२ ते २००४ या काळात उत्तर प्रदेश, दिल्लीजवळचे गुरगाव आणि राजस्थान या परिसरात देवेंद्र शर्माने थैमान घातले होते. देवेंद्र शर्माने अनेक कार, वाहनांची चोरी केली आणि जवळपास ४० ड्रायव्हरचा खून केला. विशेष म्हणजे देवेंद्र शर्मा हा एक डॉक्टर होता. देवेंद्र शर्मा आयुर्वेदिक डॉक्टर होता. तो सातत्याने अतिरिक्त कमाईचे साधन शोधत होता. याच प्रयत्नात त्याने उत्तर प्रदेश, दिल्लीजवळचे गुरगाव आणि राजस्थान या परिसरात कारची चोरी करण्यात सुरूवात केली. कार चोरून तो ड्रायव्हरचा खून करायचा. अटक केल्यानंतर त्याने यातील ३० ते ४० खूनांची कबुली दिली होती. २००८ मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मागील वर्षीच समोर आले होते की देवेंद्र शर्माने १०० लोकांचा खून केला होता आणि त्यांचे मृतदेह मगरींना खायला दिले होते.

४. सायनाइड मोहन -

सीरियल किलर मोहन कुमारला सायनाइड  या नावानेदेखील ओळखले जाते. मोहन कुमारला २० महिलांच्या हत्या करण्यासंदर्भात अटक करण्यात आली आहे. महिलांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यानंतर तो त्या महिलांना गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला लावायचा. प्रत्यक्षात त्या गर्भनिरोधक गोळ्या नसून सायनाइडच्या गोळ्या होत्या. २००५ ते २००९ या वर्षांमध्ये मोहन कुमारने २० महिलांची या पद्धतीने हत्या केली होती. असे म्हटले जाते की तो अनेक बॅंकांची फसवणूक करणे आणि आर्थिक घोटाळे यामध्येही सामील होता. डिसेंबर २०१३ मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

५. निठारी केस -

दिल्लीतील नॉयडा परिसरातील निठारी हत्याकांड तर खूपच चर्चेत होते. दिल्लीतच हा भयानक प्रकार घडल्याने याची देशभर खूप चर्चा झाली होती. निठारीमध्ये १६ पेक्षा जास्त लहान मुलांची हत्या, बलात्कार करण्याचा आरोप मोहिंदर सिंह पंढेर आणि सुरिंदर कोली या दोघांवर होता. मोहिंदर सिंह पंढेर या दिल्लीतील नॉयडामधील एक श्रीमंत व्यापारी होता. २००५ ते २००६ या काळात निठारी गावातील १६ बेपत्ता मुलांच्या कवट्या मोहिंदर सिंह पंढेरच्या घरामागील नाल्यात सापडल्या होत्या. त्या परिसरातील सर्वच बेपत्ता मुलांचा तपास पंढेरच्या घराजवळ येऊन थांबत होता. पोलिसांनी पंढेर आणि त्याचा नोकर सुरिंदर कोली यांना अटक केली होती. या दोघांवरही बलात्कार, नरभक्षण आणि मानवी अवयवांच्या तस्करीचा आरोप होता. यामध्ये काही आरोप खरे होते तर काही अफवा होत्या. कोली आणि पंढेर या दोघांनाही २०१७ मध्ये मृत्यूदंडांची शिक्षा देण्यात आली होती.

६. एम जयशंकर- 

एम जयशंकरवर ३० महिलांवर बलात्कार आणि १५ महिलांचा खून केल्याचा आरोप होता. २००८ ते २०११ या काळात त्याने हे बलात्कार आणि खून केले होते. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये एम जयशंकरने ३० बलात्कार आणि १५ खून, दरोडे इत्यादी गुन्हे केले होते. अटक केल्यानंतर त्याला बंगळूरू येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिथे तो मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. तुरुंगातून पळण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर एम जयशंकरने २०१८ मध्ये आत्महत्या केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी