सिरम इंग्लंडमध्ये गुंतवणूक का करते आहे, काय कारण आहे का पूनावाला यांच्या 'पुण्या'ऐवजी 'लंडन'वरील फोकसचे?

लोकल ते ग्लोबल
Updated May 07, 2021 | 17:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

ध्या सिरम इन्स्टिट्युट इंग्लंडमध्ये सेल्स ऑफिस, क्लिनिकल ट्रायल, संशोधन आणि विकास आणि लस उत्पादन याचा प्रकल्प सुरू करणार आहे. सिरम इंग्लंडमध्ये जवळपास २,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.

Serum invests in UK
सिरमची इंग्लंडमध्ये गुंतवणूक 

थोडं पण कामाचं

  • सिरम इंग्लंडमध्ये सुरू करणार प्रकल्प
  • इंग्लंडमध्ये मिळते करसवलत
  • फार्मा कंपन्यांचा भर संशोधनावर

नवी दिल्ली : पुणे स्थित जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी, सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (SII)इंग्लंडमध्ये जवळपास २,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची बातमी ४ मे ला आली होती. ही माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वत: दिली होती आणि त्यांनी सांगितले होते की सिरम इन्स्टिट्युटच्या या प्रकल्पात भविष्यात लसदेखील तयार केली जाऊ शकते. सध्या सिरम इन्स्टिट्युट इंग्लंडमध्ये सेल्स ऑफिस, क्लिनिकल ट्रायल, संशोधन आणि विकास आणि लस उत्पादन याचा प्रकल्प सुरू करणार आहे.

इंग्लंड फार्मा कंपन्यांना सुगीचे दिवस


पूनावाला यांच्या इंग्लंडमधील गुंतवणुकीनंतर भारतीय फार्मा कंपन्या इंग्लंडमध्ये गुंतवणूक का करत असल्याची चर्चा सुरू आहे. भारतीय फार्मा कंपन्यांना इंग्लंडमध्ये सुगीचे दिवस येतात का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. सीएनबीसी मध्ये आलेल्या एका अहवालानुसार अदर पूनावाला यांनी इंग्लंडमध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा अचानक आणि भावनात्मकरित्या घेतलेला नाही. या अहवालानुसार सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (SII)ही तुलनेने उशीरा इंग्लंडमध्ये पोचली आहे. भारतीय फार्मास्युटीकल्स कंपन्या इंग्लंडमध्ये फार वेगाने विस्तार करत आहेत. इंग्लंडमध्ये जोरदार घोडदौड करणाऱ्या ४९ भारतीय कंपन्यांमध्ये फार्मा कंपन्या सर्वात पुढे आहेत.

इंग्लंड सरकारचे आर अॅंड डी वर विशेष लक्ष


इंग्लंडमध्ये फार्मा कंपन्यांच्या होत असलेल्या वाढीमागे काही कारणे आहेत. इंग्लंड सरकार फार्मा कंपन्यांच्या संशोधन आणि विकासावर मोठा खर्च करते. इंग्लंड सरकार संशोधन करणाऱ्या कंपन्यांना करामध्ये मोठी सवलत देते. इंग्लंडमध्ये जर एखाद्या कंपनीने संशोधन आणि विकासावर (R&D)१,००० पौंड खर्च केले तर त्या कंपनीला १,३०० रुपयांची करसवलत मिळते. सिरम इन्स्टिट्युट सारख्या मोठ्या कंपन्यांना तिथे रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर क्रेडिट स्कीमचा लाभ मिळतो. यामध्ये कंपन्यांना १३ टक्के टॅक्स क्रेडिट मिळते.

संशोधनासाठी मिळते मोठी कर सवलत


सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सध्या इंग्लंडमध्ये संशोधन आणि विकास केंद्र सुरू करणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनिका (AstraZeneca)बरोबर संयुक्तपणे लस तयार करण्यासाठी सिरम संशोधन करणार आहे. यामुळे कंपनीला करात मोठी सवलत मिळते आहे. यामुळेच तिथे नवीन प्रोडक्ट येण्याची चिन्हे आहेत. कंपनीने नोजल स्प्रेची घोषणा केली आहे. 
ज्या पद्धतीने कोरोना विषाणू सतत म्युटेट होतो आहे ते पाहता फार्मा कंपन्यांना सतत आपल्या संशोधनावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला संशोधन करण्यासाठी इंग्लंड हा एक चांगला पर्याय दिसतो आहे. याशिवाय येथून जागतिक पुरवठासुद्धा सहज सोपा असणार आहे.

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे सिरम


सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियावर सध्या जगाचे लक्ष आहे. लसींच्या संख्येच्या दृष्टीने सिरम जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरम अॅस्ट्राझेनिकाची कमी किंमतीतील लस तयार करते आहे. भारतात ही लस कोविशील्ड (Covishield)या नावाने विकली जाते आहे. अदर पूनावाला काही दिवसांपूर्वीच लंडन येथे पोचले होते. त्यानंतर त्यांनी द टाईम (The TIME)या मासिकाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की भारतात धमकावले जात असल्यामुळे मी लंडनमध्ये आलो आहे. मला तिथे मोठे आणि ताकदवान लोक धमक्यांचे फोन देत होते. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. प्रत्येकालाच वाटते की सर्वात आधी लस त्यांनाच मिळावी. यामुळेच मी भारतातून लंडनमध्ये आलो आहे. सध्या अदर पूनावाला हे लंडनमध्येच आहेत. नंतर ट्विट करत पूनावाला यांनी मी लवकरच भारतात परतेन असे म्हटले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी