पाकिस्तानच्या २६२ आंतरराष्ट्रीय वैमानिकांकडे बोगस लायसन्स

ground 262 Pakistani pilots over reports of fake licences पाकिस्तानच्या २६२ आंतरराष्ट्रीय वैमानिकांच्या लायसन्सविषयी जगभरातील देशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Several international airlines ground 262 Pakistani pilots over reports of fake licences
पाकिस्तानच्या २६२ आंतरराष्ट्रीय वैमानिकांकडे बोगस लायसन्स 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानच्या २६२ आंतरराष्ट्रीय वैमानिकांकडे बोगस लायसन्स
  • अपुऱ्या अनुभवामुळे वैमानिकाने केली चूक, कराचीत विमानाचा अपघात
  • व्हिएतनाममध्ये पाकिस्तानच्या २७ वैमानिकांचे लायसन्स निलंबित

नवी दिल्ली: चिनी कर्जावर जगणाऱ्या पाकिस्तानची जगात नाचक्की होत आहे. पाकिस्तानच्या २६२ आंतरराष्ट्रीय वैमानिकांच्या लायसन्सविषयी जगभरातील देशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तान ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैमानिक म्हणतो त्यांच्या प्रशिक्षणाविषयी जगातून उघडपणे प्रश्न विचारले जात आहेत.

अपुऱ्या अनुभवामुळे वैमानिकाने केली चूक, कराचीत विमानाचा अपघात

पाकिस्तानमध्ये याच वर्षी २२ मे रोजी लाहोर-कराची विमानाला कराची येथे अपघात झाला होता. विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात विमानाची सगळी इंजिन बंद झाली. विमान कराचीमधील एका नागरी वस्तीत जाऊन कोसळले. या विमानात ९१ प्रवासी आणि वैमानिकांसह ८ क्रू सदस्य होते. अपघातातून दोन प्रवासी वाचले. बाकी सर्वांचा मृत्यू झाला होता. या अपघातासाठी वैमानिकाचा अपुरा अनुभव हेच सर्वात मोठे कारण असल्याचे विमान वाहतूक क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत. 

व्हिएतनाममध्ये पाकिस्तानच्या २७ वैमानिकांचे लायसन्स निलंबित

व्हिएतनामच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने त्यांच्या देशात कार्यरत असलेल्या पाकिस्तानच्या सर्व २७ वैमानिकांचे लायसन्स निलंबित केले आहे. करार संपल्यामुळे अथवा कोरोना संकटामुळे १५ वैमानिक मागील अनेक दिवसांपासून काम करत नव्हते. पण जे १२ जण कार्यरत होते त्यांनाही आता काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या २७ वैमानिकांनी जी माहिती देऊन व्हिएतनाममध्ये नोकरी मिळवली त्या माहितीविषयी सरकारी यंत्रणेने संशय व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या वैमानिकांनी प्रशिक्षण अपूर्ण असतानाच बनावट लायसन्स तयार करुन घेतले. या लायसन्सच्या जोरावर पाकिस्तानचे वैमानिक असंख्य प्रवाशांचा जीव धोक्यात घालत होते, असे व्हिएतनामच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले. 

व्हिएतनामच्या सरकारी विमान कंपन्यांमध्ये १२६० वैमानिक आहेत. यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त वैमानिक परदेशी आहेत. या परदेशी वैमानिकांपैकी पाकिस्तानच्या २७ वैमानिकांनी बनावट लायसन्स आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन व्हिएतनामच्या सरकारी विमान कंपन्यांची तसेच प्रवाशांची फसवणूक केली, असा आरोप व्हिएतनामच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने केला आहे. पाकिस्तानच्या वैमानिकांचे लायसन्स रद्द केल्यानंतर प्राधिकरणाने या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करुन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या १५० वैमानिकांचे लायसन्स बोगस, चौकशी सुरू

व्हिएतनाम पाठोपाठ आखाती देशांमधील विमान कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या पाकिस्तानच्या वैमानिकांची चौकशी सुरू झाली आहे. ओमान, कतार आणि कुवेत या तीन देशांनी आपापल्या देशात वैमानिक आणि विमानाशी संबंधित तांत्रिक काम करणाऱ्या पाकिस्तानच्या अनेक नागरिकांना काम स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (Pakistan International Airlines ) या पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीनेही १५० पाकिस्तानी वैमानिकांना काम स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. 

जगभरातील २६२ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाकिस्तानी वैमानिकांची चौकशी

प्रशिक्षण अपूर्ण असताना बनावट कागदपत्रांच्या जोरावर नोकरी मिळवून प्रवाशांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या जगभरातील २६२ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाकिस्तानी वैमानिकांची चौकशी सुरू आहे. या सर्व वैमानिकांना काम थांबवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

इंटरनॅशनल एअर ट्रान्ससपोर्ट असोसिएशन (International Air Transport Association) या संस्थेने पाकिस्तानच्या २६२ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैमानिकांची चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चौकशीतून निर्दोष सुटका होईपर्यंत संबंधित वैमानिकांना विमान चालवण्यास बंदी करण्यात आली आहे, असे इंटरनॅशनल एअर ट्रान्ससपोर्ट असोसिएशनने सांगितले.

एकाच देशाच्या २६२ वैमानिकांची एकदम चौकशी सुरू असण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीच्या क्षेत्रात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी