IOC Plant | प. बंगालमध्ये इंडियन ऑईलच्या कारखान्यात मोठी आग! 3 मृत्यूमुखी, ४४ जखमी, ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक

IOC Plant Fire | पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात भीषण आग लागून ३ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जण जखमी झाले आहेत. आज (२१ डिसेंबर) दुपारी लागलेल्या या आगीत मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. इंडियन ऑइलच्या हल्दिया येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पात शटडाउनसंबंधीचे काम सुरू असताना ही आग लागली आहे. इंडियन ऑइलकडून देण्यात आलेल्या स्टेटमेंटनुसार फ्लॅश उडाल्याने आग लागल्याचे प्रथमदर्शनी वाटते आहे.

IOC plant Fire
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या कारखान्यात आग  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • इंडियन ऑइलच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पात मोठी आग
  • पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील प्रकल्पात लागली आग
  • जखमींना कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले

IOC Plant Fire | हल्दिया: पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात भीषण आग लागून ३ जणांचा मृत्यू झाला असून ४४ जण जखमी झाले आहेत. आज (२१ डिसेंबर) दुपारी लागलेल्या या आगीत मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. इंडियन ऑइलच्या हल्दिया येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पात शटडाउनसंबंधीचे काम सुरू असताना ही आग लागली आहे. इंडियन ऑइलकडून देण्यात आलेल्या स्टेटमेंटनुसार फ्लॅश उडाल्याने आग लागल्याचे प्रथमदर्शनी वाटते आहे. (Severe fire broke out at IOC plant in West Bengal's Haldia, 3 died & 44 injured)

जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले

इंडियन ऑइलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आगीत जखमी झालेल्यांना प्रथमोपचार केंद्रात प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना हल्दिया येथील रिफायनरी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. आग लागलेल्या ठिकाणाहून जखमींना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेण्यात आली आहे. जखमींना आणि गंभीर इजा झालेल्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये पोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर लागू करण्यात आला होता. 

७ जणांची प्रकृती गंभीर

हल्दिया महानगरपालिकेचे चेअरमन इन कौन्सिल, एस के अजगर अली यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. पूर्व मेदिनिपूर जिल्ह्याच्या एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जखमी झालेल्यांमधील ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. 

ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेनंतर आपला शोक संदेश व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हल्दिया येथील इंडियन ऑइलच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात अतिशय भीषण अशी आग लागली होती. या आगीत तीन जणांनी जीव गमावला आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या भावना आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसमवेत आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांनी ग्रीन कॉरिडॉर लागू करत कोलकाता येथे आणण्यात आले आहे. पश्चिम बंगाल सरकार जखमीं लवकरात लवकर बरे होण्यासाठी आपले सर्व सहकार्य देणार आहे.'

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही देशातील महत्त्वाची पेट्रोलियम कंपनी आहे. ही एक सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी असून ती केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा हल्दिया येथे महत्त्वाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या तेलशुद्धीकरण प्रकल्पात दरवर्षी २.५ मिलियन कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते. या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची सुरूवात जानेवारी १९७५ मध्ये झाली होती. हल्दिया येथील हा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोलकात्याजवळ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी