Gujrat Self Marriage Issue : तरुणीला करायचंय स्वतःशीच शास्त्रोक्त पद्धतीनं लग्न, संस्कृतीरक्षकांचा तीव्र विरोध

ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक प्रेम करतो, त्या व्यक्तीशी लग्न केलं पाहिजे, असं आपलं मत आहे. त्यामुळे मी स्वतःशीच लग्न करणार आहे, असं वडोदऱ्याच्या शमा बिंदू या तरुणीनं जाहीर केलं आहे. देशभर याची चर्चा सुरू झाली असून राजकीय विरोधही सुरू झाला आहे.

Gujrat Self Marriage Issue
स्वतःशीच करायचंय लग्न  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • शमा बिंदूला करायचंय स्वतःशीच लग्न
  • वडोदराच्या माजी उपमहापौरांचा लग्नाला तीव्र विरोध
  • लग्न झाल्यावर हनीमूनसाठी गोव्याला जाणार

Gujrat Self Marriage Issue : गुजरातमधील (Gujrat) एका तरुणीचं स्वतःवर इतकं खोल प्रेम आहे की तिनं आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वतःचीच निवड (Self Marriage) केली आहे. गुजरातच्या वडोदरा शहरात राहणाऱ्या 24 वर्षांच्या शमा बिंदूनं स्वतःशीच लग्न करण्याची घोषणा केली आहे. अगदी पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं, वाजतगाजत हे लग्न करण्याची तिची इच्छा आहे. इतर लग्नांपेक्षा यात वेगळेपणा इतकाच की इथं नवरा नसेल. बाकी सगळं काही त्याच पद्धतीने होणार आहे. शमाच्या या निर्णयाला गुजरातमधून विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. 

राजकीय विरोध

गुजरातमधील एकाही मंदिरात हे लग्न होऊ  देणार नाही, अशी तंबीच वडोदराच्या माजी उपनगराध्यक्ष सुनीत शुक्ला यांनी दिली आहे. एका व्यक्तीने लग्न करणे हे हिंदू संस्कृतीच्या विरोधी कृत्य असल्याचं त्यांचं म्हणं आहे. तरुणीची मानसिक अवस्था ठिक नसून तिच्यावर तिच्या कुटुंबीयांनी उपचार करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. हिंदू शास्त्र आणि वैदिक शास्त्रांनुसार विवाह ही एक संस्था आहे आणि सामाजिक व्यवस्थेशी विवाह संस्थेची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा एकल विवाह हा शास्त्रांच्या विरोधातील आहे, असा त्यांचा दावा आहे. 

अधिक वाचा - Sri Lanka Financial Crisis : शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झाली सेक्स वर्कर, कुणी ओळखीचं तर येणार नाही? सतत वाटते धाकधूक

भटजींनीही घेतली माघार

शमाला अशाच प्रकारे एकल विवाह करायचा  असेल. तर तिने शहरातील कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा हॉलमध्ये लग्न करावं. मंदिरांमध्ये असे प्रकार झालेले खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या लग्नात राजकारणात घुसल्याचं लक्षात आल्यावर लग्न लावण्यासाठी तयार झालेल्या भटजींनीही माघार घेतली आहे. 

लग्न नको, पण नवरी बनायचंय

मला कधीच लग्न करण्याची इच्छा नव्हती, मात्र मला नवरी बनायचं होतं. त्यामुळेच मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया शमानं दिली आहे. स्वतःवर प्रेम कसं करावं, याचा धडा घालून देणारी भारतातील कदाचित मी पहिलीच मुलगी असेन, असा आत्मविश्वासही शमानं व्यक्त केला आहे. 

अधिक वाचा - Indian Railway New Luggage Rules: विमानाप्रमाणे रेल्वेतही सामानाची मर्यादा ठरली, ‘मापात’ न राहणाऱ्यांना होणार दंड

महिलाही तितक्याच महत्त्वाच्या

एका खासगी कंपनीत नोकरी करणारी शमा म्हणते की समाजात पुरुषांइतकंच महत्त्व महिलांनादेखील असलं पाहिजे. वास्तविक, आपण ज्या व्यक्तीवर सर्वाधिक प्रेम करतो, त्याच्याशीच लग्न करावं. मी इतर कुणाहीपेक्षा स्वतःवरच सर्वाधिक प्रेम करते. त्यामुळे मी स्वतःशी लग्न कऱण्याचा निर्णय घेतला आहे. 

हनीमूनला जाणार गोव्याला

आपल्या लेकीची ही कल्पना तिच्या आईवडिलांना जाम आवडली आहे. त्यांनी या लग्नाला होकार दिला असून तिला आशीर्वाद दिले आहेत. लग्न झाल्यावर शमा हनीमूनसाठी गोव्याला जाणार आहे. गोव्यात दोन महिने स्वतःसोबत घालवून पुन्हा ती आपल्या कामाला लागेल. या लग्नाची सध्या देशभर जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी