VIDEO: शरद पवार म्हणतात, 'महिला मुख्यमंत्री झाल्यास...'

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 15, 2019 | 14:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sharad Pawar on female Chief Minister: राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरुन निर्माण झालेला सत्ता संघर्ष अद्याप थांबलेला नाहीये. हे सर्व सुरु असताना आता शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

sharad pawar female chief minister maharashtra vidhan sabha election supriya sule ncp news marathi
VIDEO: शरद पवार म्हणतात, 'महिला मुख्यमंत्री झाल्यास...' 

नागपूर: राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरुच आहेत. दररोज राज्याच्या राजकारणात नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुनच तिढा निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत सरकार बनवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्रिपदासाठीच आता राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं घडणार असल्याचं समोर येत आहे. याच दरम्यान भविष्यात राज्यात महिला मुख्यमंत्री असण्याच्या प्रश्नावर शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

भविष्यात महिला मुख्यमंत्र्यांबाबत आपली काय भूमिका आहे? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं, महिला मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आनंदच होईल. पण त्यासाठी तेवढं बहुमत पाहिजे, मागणी पाहिजे. आज हा विषय आमच्यासमोर अजिबात नाहीये.

चर्चांना उधाण

राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आनंदच होईल असं शरद पवार म्हणाल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. जर महाशिवआघाडी सोबत सत्ता स्थापन झाल्यास अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री या फॉर्म्युल्यावर शिवसेनेला अडीच वर्षे आणि राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळू शकतं. अशात राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात आणत मुख्यमंत्रिपदावर बसवणार का? अशी सुद्धा चर्चा होत आहे.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असेल? या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटलं, माहिती नाही... त्याबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा खूपच प्राथमिक स्थरावर आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत जर कोणाची मागणी असेल तर त्याचा विचार नक्की करावा लागेल.

शरद पवार सध्या दोन दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या पिकांची पाहणी शरद पवार करत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्याचा आम्ही अभ्यास करू. केंद्रातील कृषी आणि अर्थमंत्र्यांना भेटून केंद्र सरकारने याप्रकरणी बैठक बोलवावी. शेती संबंधित संस्था, राज्य सरकारचे प्रतिनिधी यांनाही बैठकीला बोलवावे असा प्रस्ताव मांडणार असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी