पंतप्रधान मोदींना भेटले शरद पवार

Sharad Pawar meet Prime Minister Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली.

Sharad Pawar meet Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान मोदींना भेटले शरद पवार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान मोदींना भेटले शरद पवार
  • भेट संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात
  • भेटीत सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा

Sharad Pawar meet Prime Minister Narendra Modi : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली. भेटीत सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. पवार पंतप्रधानांना भेटल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाल्याची चर्चा आहे. लवकरच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्रात ईडी सक्रीय आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित काही मालमत्तांची ईडीने जप्ती केली. मागील काही महिन्यांत ईडीने महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या संपत्तीचीही जप्ती केली. या कारवायांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतल्याचे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. ईडी कोंडी करण्यासाठी कारवाई करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सातत्याने करत आहे. 

याआधी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाशी संबंधित असलेल्या निवडक खासदार, आमदार यांना  स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. या प्रसंगी भाजपकडून नितीन गडकरी उपस्थित होते. पवारांकडच्या स्नेहभोजनाआधी गडकरींनी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठे घडणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयकडे

खंडणी वसुली आणि आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयने घेतला आहे. सीबीआय अनिल देशमुखांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची शक्यता आहे. पवारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यामागे सीबीआयची कारवाई हे कारण आहे की नाही हे अधिकृतरित्या अद्याप समजलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी