"परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर; चौकशीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे, देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय"

Sharad Pawar on Param Bir Singh letter: परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.

Sharad Pawar
शरद पवार (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खळबळजनक पत्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप
 • परमबीर सिंग यांचे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळले

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir singh) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांनंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली असून भाजप (BJP), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी एक पत्रक जाहीर करुन आपली बाजू मांडली आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 1. अनिल देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय घेऊ, त्याआधी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ 
 2. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय सर्वांशी बोलून घेऊ 
 3. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत या प्रकरणावर चर्चा करणार
 4. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण त्यात यश येणार नाही
 5. या प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, सरकार स्थिर 
 6. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आलं 
 7. परमबीर सिंग आणि माझी भेट झाली होती, गाडीत आढळलेल्या स्फोटकांसंबंधी परमबीर यांच्यासोबत चर्चा झाली
 8. चौकशीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा
 9. पत्रात आरोप केला मात्र, पुरावे नाहीत
 10. आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी आरोप केले नाहीत
 11. बदली झाल्यानंतरच परमबीर सिंग यांनी आरोप केले
 12. सचिन वाझे यांना सेवेत घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांचाच
 13. १०० कोटी कुणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात नाही
 14. पत्रात उल्लेख केलेले पैसे कुणाकडे गेले?
 15. परमबीर सिंग यांच्या पत्रावर स्वाक्षरी नाहीये
 16. पत्रात पैसे जमा करण्याविषयी माहिती नाही
 17. दुसरं म्हणजे डेलकर प्रकरण आहे
 18. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत
 19. परमबीर सिंग यांच्या पत्राचे दोन भाग आहेत
 20. परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
 21. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
 22. शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू

परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. यामध्ये अनिल देशमुखांनी म्हटलं, "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वत:चा बजाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरुन परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत. पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनकसानीचा खटला दाखल करत आहे."

परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात काय म्हटलं?

"सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर अनेकदा बोलवलं. यावेळी गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास १ हाजर ७५० बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील इतर काही बाबींचा समावेश होता. ज्यातील प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा करण्याचं म्हटलं होतं. म्हणजे महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये होतील. तर उर्वरित पैसे इतर बाबीतून मिळवता येतील." असा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी