United Opposition : पवार, ठाकरे, नितीश एका मंचावर! रविवारी घुमणार विरोधकांच्या एकीचा आवाज

विरोधकांची मोट बांधण्याचा आणि त्यांना एकाच मंचावर आणण्याचा आणखी एक प्रयत्न येत्या रविवारी होणार आहे. त्यामध्ये पवार, ठाकरे आणि नितीश कुमार एकत्र येणार आहेत.

United Opposition
पवार,ठाकरे, नितीश एकाच मंचावर!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रीय लोकदलाच्या कार्यक्रमात विरोधी नेते एकाच मंचावर
  • उद्धव ठाकरे, शरद पवार, नितीश एकाच मंचावर
  • ममता बॅनर्जींच्या भूमिकेकडे लक्ष

United Opposition : देशातील वेगवेगळ्या विरोधी पक्षांचे (Opposition parties) नेते एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. 25 सप्टेंबर म्हणजेच येत्या रविवारी हरियाणात (Haryana) एका कार्यक्रमादरम्यान सर्व विरोधकांना एकाच मंचावर आणण्याच्या प्रयत्नांना यश येत असून बहुतांश विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण स्विकारलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar), बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav), कनिमोझी (Kanimozi) यासारखे अनेक नेते एकाच मंचावर दिसणार आहेत. भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे संस्थापक आणि देशाचे माजी उपपंतप्रधान देवी लाल यांच्या जयंतीचं निमित्त साधून सर्व पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन राष्ट्रीय लोकदलानं केलं आहे. त्याला विरोधी पक्षांचे नेते सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं चित्र आहे. 

2024 ची तयारी 

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपापल्या भागातील त्यांच्या ताकदीचा वापर करणं आणि एकमेकांची मदत करत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणं, असा यामागचा उद्देश आहे. भारतात गेल्या काही वर्षात काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी प्रादेशिक पक्ष अद्यापही आपला प्रभाव टिकवून आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या त्या राज्यात प्रभावी असणाऱ्या प्रादेशिक पक्षांना इतर राज्यातील मित्रपक्षांनी बळ देऊन अधिकाधिक खासदार निवडून आणण्याची रणनिती सध्या विरोधी पक्षाचे नेते आखत आहेत. या सर्व पक्षांची मोट बांधणं हे मोठं जिकीरीचं काम असून विरोधी पक्षांचे नेते कोण होणार, हादेखील सध्या चर्चेचा विषय आहे. जो कुणी विरोधी पक्षाचा नेता होईल, तोच पर्यायाने पंतप्रधानपदाचा विरोधी पक्षाचा उमेदवार असणार, हे साहजिक आहे. मात्र यानिमित्ताने सर्व विरोधक एका मंचावर येणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

अधिक वाचा - Congress President Election: शशी थरूर यांच्या नावावर G - 23 नेते असहमत, अशोक गेहलोतसोबत आणखी एक नेता अध्यक्षपदाच्या शर्यतीत

कोण होणार सहभागी?

रविवारी होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाला देशातील सर्व भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी हे या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याशिवाय भाजप नेते बिरेंदर सिंग यांनादेखील या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती जेडीयुचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी दिली आहे. 

अधिक वाचा - Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मशिदीत पोहोचले आणि इमामांची भेटही घेतली, VIDEO

यांच्या होकाराची प्रतीक्षा

या कार्यक्रमाचं आमंत्रण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव, शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांच्यासह विरोधी पक्षाच्या इतरही नेत्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण धाडण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या सहभागाबाबत अद्याप ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी