सत्तास्थापनेच्या चर्चेचा वाद टोकाला, 'त्याने' चावून तोडला मित्राचा कान 

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 15, 2019 | 11:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Man bites friends ear in Latur: राज्यात सत्तास्थापनेवरुन राजकीय पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार हा प्रश्न सर्वांच्याच मनात असताना एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे. 

shiv sena vs bjp government formation maharashtra latur man bites friends ear nilanga clash vidhan sabha election
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images
थोडं पण कामाचं
  • राज्यातील सत्ता संघर्षावरुन मित्रांत रंगली चर्चा
  • चर्चेचा वाद पोहोचला टोकाला
  • रागाच्या भरात तरुणाने चावला मित्राचाच कान
  • कानाला चावा घेऊन तोडला कान 
  • लातूर जिल्ह्यातील घटना 

लातूर: विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून आता कोणाचं सरकार येणार यावरुन विविध चर्चा होत आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठका दररोज होत आहेत. या बैठकीत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाहीये. त्याच प्रमाणे सामान्य नागरिकांतही राजकीय विषयावर चर्चा होताना दिसत आहेत. अशाच प्रकारे सुरु असलेल्या चर्चेत एक विचित्र घटना घडली आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चक्क कानच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असलेल्या इनामवाडी येथे रत्नाजी नाईकवाडे, शैलेश नाईकवाडे आणि संदीप शिंदे हे तीन मित्र गप्पा मारत होते. या मित्रांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा टोकाला पोहोचली आणि मग त्यातून वाद निर्माण झाला. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात का बोलतोस असं म्हणत रत्नाजी नाईकवाडे या तरुणाने संदीप शिंदे याचा कान चावला. या घटनेत संदीप शिंदे याचा कान तुटल्याचं समोर आलं आहे.

रत्नाजी नाईकवाडे आणि संदीप शिंदे यांच्यात झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीतही झालं. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. या प्रकरणी संदीप शिंदे याच्या भावाने लातूर जिल्ह्यातील निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या संदीप शिंदे याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राज्यात कोणत्याचं पक्षाचं सरकार स्थापन झालेलं नाहीये. शिवसेनेने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून एक किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात येणआर असून त्यानंतर तिन्ही पक्षांचे अध्यक्ष अंतिम निर्णय घेणार आहेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी