Shocking reason behind murder of singer Sidhu Musewala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (sidhu musewala) याच्या हत्येचे (murder) धक्कादायक कारण समजले आहे. पंजाब पोलिसांच्या (punjab police) स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गोल्डी नावाच्या गुंडाने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे जाहीर केले. गोल्डी कॅनडामध्ये आहे तर लॉरेन्स बिश्नोई दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. यामुळे पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेलने तिहार जेलमध्ये जाऊन लॉरेन्स बिश्नोई (laureus bishnoi) याची चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक माहिती हाती आल्याचे स्पेशल सेलने सांगितले.
लॉरेन्स आणि गोल्डी या दोघांची इच्छा मुसेवालाने लॉरेन्ससाठी गाणी गावी अशी होती. पण सिद्धू मुसेवाला लॉरेन्ससाठी गाणी गाण्यास इच्छुक नव्हता. सिद्धूने स्वतःच्या संरक्षणासाठी दविंदर बंबीहा याच्या टोळीशी संपर्क साधला होता.
सिद्धू मुसेवाला प्रकरणात पंजाब पोलीस लॉरेन्सचा भाऊ अनमोल याचीही चौकशी करण्याची तयारी करत आहेत. पण अनमोल सध्या ऑस्ट्रिया येथे आहे. यामुळे त्याच्या चौकशीला वेळ लागण्याची शक्यता आहे.
लॉरेन्स बिश्नोई सिद्धू मुसेवाला प्रकरणात कोर्टात येण्याजाण्याच्या निमित्ताने पळून जाऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी शस्त्रे ईशान्य भारतातून उत्तर प्रदेशमार्गे पंजाबमध्ये पोहोचली असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.
लॉरेन्स बिश्नोई याचा आतापर्यंत कोणत्याही हत्येच्या प्रकरणात थेट सहभाग असल्याचे पुरावे आढळलेले नाही. लॉरेन्स तिहार जेलमध्ये बसून स्वतःच्या संपर्क यंत्रणेच्या मदतीने एका टोळीने घेतलेले काम दुसऱ्या टोळीकरवी पूर्ण करून घेण्यासाठी बदनाम आहे. भारतात आणि भारताबाहेर असे बिश्नोई टोळीचे ७०० शूटर्स आहेत. लॉरेन्स बिश्नोई ३१ वर्षांचा आहे पण आतापर्यंत त्याच्या विरोधात ६५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकदा तर पोलिसांच्या तावडीतून लॉरेन्स फरार झाला आहे.
लॉरेन्ससाठी कॅनडातून गोल्डी आणि सतिंदर काम करतात. तसेच ऑस्ट्रियातून लॉरेन्सचा भाऊ अनमोल काम लॉरेन्सच्या टोळीसाठी काम करतो. लॉरेन्स कटाची अंमलबजावणी करणाऱ्यांशी थेट संवाद साधत नाही. तो कायम त्याच्या विश्वासातल्या माणसांकरवी आदेश देतो आणि स्वतःविरोधात पुरावे राहू नये आणि राहिले तरी किरकोळ स्वरुपाचे असावेत याची खबरदारी घेतो. मागील काही वर्षांपासून लॉरेन्सच्या टोळीचा संबंध मेक्सिकोतील गुंडांशी असल्याचे वृत्त आहे.