Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर शूटर्सने बनवलेला VIDEO आला समोर

Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असताना आता एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Sidhu Moose Wala murder case accused brandished guns in vehicle video goes viral
Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर शूटर्सने बनवलेला VIDEO आला समोर  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या हत्येच्या संदर्भात नवनवीन माहिती समोर येत असताना आता हत्याकांडाच्या संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मुसेवाला हत्याकांडातील आरोपी अंकित सिरसा, प्रियव्रत, कपिल, सचिन भिवानी आणि दीपक हे एका कारमध्ये बसून प्रवास करत आहेत. यावेळी त्यांच्या हातात पिस्तूल दिसत आहेत. आरोपी हे पिस्तूल फिरवून दाखवताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. (Sidhu Moose Wala murder case accused video goes viral)

व्हिडिओत दिसत आहे की, कारमध्ये बसलेल्या सर्वांच्या हातात पिस्तूल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सिद्धू मुसेवाला याची हत्या केल्यावर कारमधून पळून जात असताना हा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ आता समोर आला आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पोलिसांच्या स्पेशल सेलने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुसेवाला याला कथितपणे जवळून गोळी मारणाऱ्या शूटरचाही समावेश आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी  अंकित आणि सचिन भिवानी या दोघांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील शूटर्सपैकी अंकित एक आहे. तर भिवानी याने या सर्व शूटर्सला आसरा दिला होता आणि इतर मदत केली होती.

हे पण वाचा : अमेरिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या परेडवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 57 जखमी

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हरियाणात राहणारा भिवानी हा राजस्थानमध्ये लॉरेंस बिश्नोई टोळीचं काम पाहतो. राजस्थानमधील चुरू येथील आणखी एका गुन्ह्यात भिवानी हा पोलिसांच्या टार्गेटवर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित आणि भिवानी या दोघांकडून एक 9 एमएम पिस्तूल आणि त्यातील 10 जिवंत काडतुसे, एक 30 एमएम पिस्तुल आणि त्याची 9 काडतुसे, पंजाब पोलिसांचे तीन गणवेश, दोन मोबाइल फोन आणि एक डोंगल, एक सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात मुसेवाला याच्या हत्येप्रकरणात पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन शूटर्ससोबत तिघांना अटक केली होती. प्रियव्रत उर्फ फौजी (26), झज्जर जिल्ह्यात राहणारा आणि पंजाबमधील बठिंडा येथे राहणारा केशव कुमार (29) अशी त्यांची नावे आहेत. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेला एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आला होता. या सीसीटीव्हीत नागरिक पळून जाताना तसेच गोळीबाराचा आवाज ऐकायला येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी