sidhu moosewala murder mastermind goldy brar detained in california : गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणी इंटरनॅशनल गँगस्टर गोल्डी ब्रार याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे पकडण्यात आल्याचे वृत्त आले आहे. गोल्डी हा सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस सांगत आहेत. पोलिसांनी गोल्डीला भारतात आणून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
आधी कॅनडात असणारा गोल्डी कॅलिफोर्नियाला गेला असताना तिथे त्याला पकडण्यात आले, असे सूत्रांकडून समजते. पण गोल्डीने मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचे कारण समजलेले नाही. तसेच गोल्डीला पकडल्याप्रकरणी अद्याप भारत सरकारकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.
कॅनडात मूसेवालाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. याच कारणामुळे त्यांच्याकडून दगाफटका होऊ नये यासाठी गोल्डी कॅनडातून अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात आला. गोल्डी अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातल्या सॅक्रामेंटो शहरातील दोन घरांमध्ये आलटून पालटून वास्तव्यास होता. ही त्याची सेफ हाऊस होती. यापैकी एक घर फ्रिझो परिसरात आणि दुसरे घर सॉल्ट लेक परिसरात होते.
गोल्डी अमेरिकेत राजकीय शरणार्थी म्हणून सुरक्षित राहण्याची परवानगी मिळविण्याच्या प्रयत्नात होता. पण याआधीच त्याला पकडण्यात आले आहे. लवकरच गोल्डीला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. भारताला गोल्डीचा ताबा मिळाला तर मूसेवाला हत्याकांड प्रकरणावर आणखी प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाबी गायिका अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी
कॅनडात ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणारा गोल्डी ब्रार सिद्धू मूसेवाला हत्या कटाचा सूत्रधार आहे. तो सिद्धू मूसेवालाला ठार केल्यानंतर कॅनडातून गुपचूप अमेरिकेत स्थायिक झाला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातून गोल्डीला अटक करण्यात आली.