Presidential Elections 2022 : पहिल्या बैठकीपूर्वीच विरोधी पक्षांत फुटीची चिन्हं, ममतांच्या आमंत्रणाला येचुरींचा आक्षेप, बैठकीच्या मुहूर्तावरून रुसवेफुगवे

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बैठक आयोजित केली असताना त्याच दिवशी ममता बॅनर्जी यांनीदेखील विरोधकांना बैठकीसाठी बोलावले आहे. या प्रकारामुळे विरोधकांच्या एकजुटीचे स्वप्न भंग पावेल, अशी भिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले आहे.

Mamta Banarjee Letter
ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीवरून टीका  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image
थोडं पण कामाचं
  • ममता बॅनर्जी यांनी बोलावलीय विरोधकांची स्वतंत्र बैठक
  • विरोधकांच्या एकजुटीचा हा 'एकतर्फी' प्रयत्न धोकादायक - येचुरी
  • पहिल्या बैठकीपूर्वीच विरोधकांच्या एकजुटीवरून गोंधळ

Mamta Banarjee Letter | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये (Presidential Elections) सर्व विरोधकांनी (Opposition parties) एकत्र येत आपली ताकद दाखवून देण्याच्या उद्दिष्टावर आता रुसव्याफुगव्यांचे ढग दाटून येत असल्याचं चित्र आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधकांना 15 जून रोजी बैठकीला येण्याचं निमंत्रण एका पत्राद्वारे धाडलं आहे. मात्र त्याच दिवशी दिल्लीत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील बैठकीचं आयोजन केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या पत्रामुळे विरोधकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकत असल्यामुळे या एकतर्फी प्रयत्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने टीका केली आहे. 

ममता करतायत नुकसान - येचुरी

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी सर्व विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न अगोदरपासूनच सुरू आहेत. त्यासाठी 15 जून रोजी दिल्लीत सोनिया गांधी, शरद पवार आणि इतर विरोधी पक्षाचे नेते एकत्र जमून विचारविनिमय करणार आहेत. एक बैठक अगोदरच ठरली असताना पुन्हा विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न ‘एकतर्फी’ असल्याची टीका सीताराम येचुरी यांनी केली आहे. अशा प्रकारांमुळे विरोधक एकत्र येण्याऐवजी त्यांच्यात अधिक फूट पडण्याची शक्यता असल्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. 

अधिक वाचा - नुपुर शर्मा प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन, मंत्र्याने केला गौप्यस्फोट

न विचारताच ठरवली बैठक

साधारणपणे जेव्हा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवायचं असतं त्यावेळी त्यातील प्रत्येकाशी वैयक्तिक चर्चा केली जाते आणि विचारमिनिमय करून अशा बैठका ठरवल्या जातात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मलाही आमंत्रण आहे, ही गोष्ट मला सोशल मीडियावरून समजली. असा प्रकारे बैठकीचं नियोजन करून काय साध्य होणार, असा सवाल येचुरी यांनी केला आहे. विशेषतः त्याच दिवशी सोनिया गांधी, शरद पवार, एम.के. स्टॅलिन यासारखे नेते बैठक घेणार असल्याचं माहिती असतानाही ममता बॅनर्जींनी वेगळी बैठक का बोलावली असावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

विरोधी पक्षांमध्ये नाराजी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षांच्या एकजुटीपेक्षा या एकजुटीचं नेतृत्व स्वतःकडे घेण्यात अधिक रस असल्याचं त्यांच्या या कृतीतून दिसत असल्याची टीका येचुरी यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी अगोदर ठरवलेल्या बैठकीच्या नियोजनात ममता बॅनर्जी यांचा सहभाग नव्हता. मात्र नेमकी त्याच दिवशी ममता बॅनर्जींनी वेगळी बैठक बोलावल्यामुळे  त्यातून काहीच साध्य होणार नसल्याची भावना विरोधी पक्षांमध्ये असल्याचं येचुरी म्हणाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव,  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे ममता बॅनर्जींच्या बैठकीला का हजर राहतील, असा सवालही येचुरी यांनी केला आहे. या बैठकीचा फायदा काहीच होणार नसून नुकसान मात्र प्रचंड होणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

अधिक वाचा - वजनदार खासदारांला गडकरींनी घातली अट, 15 KG वजन कमी करून 15 हजार कोटींची केली कमाई

जुलै महिन्यात राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होणार असून विरोधी पक्षांनी आपली ताकद दाखवण्यासाठी एकत्र मोट बांधायला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी