भारताला २७ जुलैपर्यंत मिळणार ६ राफेल विमानांचा ताफा

Rafale jet by 27 july in India भारताला फ्रान्सकडून सहा राफेल विमानांचा ताफा याच वर्षी २७ जुलैपर्यंत ताब्यात मिळणार आहे. हा ताफा अंबाला विमानतळावर ठेवला जाईल.

rafale fighter aircraft
राफेल लढाऊ विमान 

थोडं पण कामाचं

  • भारताला २७ जुलैपर्यंत मिळणार ६ राफेल विमानांचा ताफा
  • भारत आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी केली चर्चा
  • भारत रशियाकडून ३३ विमानांची खरेदी करणार

नवी दिल्ली: भारत (india) आणि चीन (china) यांच्यातील तणाव वाढत असताना फ्रान्सने (france) राफेल लढाऊ विमानांचा (rafale fighter aircraft) पुरवठा लवकर करण्याची ग्वाही दिली आहे. भारताला सहा राफेल विमानांचा ताफा याच वर्षी २७ जुलैपर्यंत ताब्यात मिळणार आहे. हा ताफा अंबाला विमानतळावर (ambala airport) ठेवण्याची भारताची योजना आहे.

भारत आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी केली चर्चा

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेंस यांच्यात  २ जून रोजी फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेअंती २७ जुलैपर्यंत भारताला ६ राफेल देण्याची ग्वाही फ्रान्स सरकारने दिली. 

फ्रान्सकडून भारताला २७ जुलैपर्यंत मिळणार ६ राफेल विमानांचा ताफा

लडाखच्या पूर्वेकडील भागात गलवान खोऱ्यात हिंसा झाल्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. परिस्थिती आणखी चिघण्याचा धोका लक्षात घेऊन भारताने ज्या देशांसोबत शस्त्र खरेदीचे करार केले आहेत अशा देशांकडून शस्त्रांचा ताबा ठरलेल्या मुदतीआधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रशियाने भारताला S 400 क्षेपणास्त्र यंत्रणा शक्य तितक्या लवकर देण्याचे आश्वासन दिले आहे. तर फ्रान्सने ६ राफेल विमानांचा ताबा तातडीने देण्याची तयारी दाखवली आहे.

राफेलसाठी २०१६ मध्ये झालेला करार

भारत आणि फ्रान्स यांच्यात ३६ राफेल विमानांसाठी एक करार झाला आहे. हा करार २३ सप्टेंबर २०१६ रोजी झाला. करार झाल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये दसऱ्याच्या (विजयादशमी) मुहूर्तावर भारताच्या सर्व मागण्या पूर्ण करणारे पहिले राफेल सज्ज झाले होते. हे विमान तयार झाल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन विमानाचा ताबा घेतला. फ्रान्सने भारताच्या वैमानिकांना फ्रान्समध्येच राफेल हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. तोपर्यंत भारतात राफेलसाठी विमानतळावर आवश्यक ती तांत्रिक तयारी पूर्ण करण्याचे काम सुरू झाले. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे फ्रान्सने भारताला सहा विमानांचा ताफा ताब्यात देण्याची तयारी दाखवली आहे.

मे महिन्यात ४ राफेल मिळणार होती पण कोरोनामुळे झाली दिरंगाई

कराराच्या नियोजनानुसार मे महिन्यात ४ राफेल भारताला मिळणार होती. मात्र कोरोना संकटामुळे जगभर लॉकडाऊन सुरू झाले. याचा राफेलच्या कामावर परिणाम झाला होता. मात्र फ्रान्सने या समस्येतून मार्ग काढून २७ जुलैपर्यंत ६ राफेल विमानांचा ताबा भारताला देण्याची तयारी केली आहे. 

भारतीय विमानतळांवर राफेलसाठी विशेष तांत्रिक तयारी

चीनच्या हालचालींमुळे तणाव वाढला असताना भारताला राफेल मिळाल्यास भारताच्या हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. राफेल अंबाला व्यतिरिक्त देशातील आणखी काही विमानतळांवर ठेवण्यासाठी संबंधित विमानतळांवर आवश्यक ती तांत्रिक तयारी केली जात आहे. ही तयारी लवकरच पूर्ण होईल.

भारत रशियाकडून ३३ विमानांची खरेदी करणार

भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला. यातील सहा विमानांचा ताफा भारताच्या ताब्यात येत आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने रशियाकडून ३३ विमानांची खरेदी करण्याची तयारी केली आहे. केंद्र सरकार लवकरच रशियासोबत विमान खरेदीचा करार करणार आहे. या करारानुसार भारत रशियाकडून १२ सुखोई आणि २१ मिग-२९ लढाऊ विमानांचा ताफा तसेच सुखोईतून हल्ला करण्यासाठी उपयुक्त अशा २१६ ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी