Murder Mystery : कुटुंबीयांसह पोलिसांचाही थरकाप उडवणारी एक मर्डर मिस्ट्री (Murder Mystery) नुकतीच समोर आली आहे. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वालियर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून रहस्य बनून राहिलेल्या एका खुनाच्या प्रकरणाचा (Murder Case) उलगडा झाला आणि सर्वांनाच जबर धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून काहीच थांगपत्ता लागत नसलेल्या एका तरुणीची कवटी पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर तपासाची चक्रं वेगाने फिरायला सुरुवात झाली. आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदवल्यापासून पोलीस ज्या तरुणाचा शोध घेत होते, त्याचा खून त्याच्या सर्वात जवळच्या मित्रानेच केल्याच्या निष्कर्षावर पोलीस पोहोचले आणि त्याला बेड्या ठोकल्या. या खुनी मित्रापर्यंत पोहोचण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा होता झाडावर लटकलेल्या एका चपलेचा. (Shoe on tree) त्या चपलेच्या संदर्भाने शोध घेताना पोलिसांना हरवलेल्या तरुणाची कवटी सापडली आणि त्यानंतर काही दिवसांतच पोलिसांनी खुनी मित्राला बेड्या ठोकल्या.
मध्यप्रदेशातील जनकगंज परिसरात राहणाऱ्या 22 वर्षांच्या आरिशची जितेंद्रसोबत मैत्री होती. दोघंही लहानपणापासूनचे मित्र होते आणि अनेकदा ते एकमेकांसोबत असायचे. 19 जुलै रोजी ते दोघं एकमेकांना भेटले आणि दोघांनी मद्यपान करण्याचा निर्णय घेतला होता. जितेंद्रच्या घरी त्यांनी दारुची पार्टी केली. या दरम्यान दोघांमध्ये काही कारणाने वाद झाला होता. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला आणि हाणामारीला सुरुवात झाली. रागाच्या भरात जिंतेंद्रने आरिशला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याचं डोकं भिंतीवर आपटलं आणि गळा दाबून त्याचा खून केला.
अधिक वाचा - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली, शिवसेनेची सुप्रीम कोर्टात नवी याचिका
आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने आरिशचा मृतदेह गटारात फेकून दिला. गटारातून मृतदेह वाहून जाईल आणि आपण खून केल्याचा कुठलाही पुरावा सापडणार नाही, असं त्याला वाटलं होतं. त्यानंतर दोन दिवस आरिश घरी न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस तक्रार केली होती. पोलिसांसोबत आरिशचा शोध घेण्यातही आरोपी जितेंद्र मदत करत असल्याचं नाटक करत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय होताच, मात्र कुठलाही ठोस पुरावा पोलिसांना मिळत नव्हता.
परिसरात शोध घेत असताना पोलिसांना झाडावर एक चप्पल पडल्याचं दिसलं. ही चप्पल आरिशची असल्याची खातरजमा त्याच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर याच परिसरात त्याच्या जीवाला दगाफटका झाला असण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपास सुरू केला. या परिसरात असणाऱ्या एका गटारात एक कवटी पोलिसांना मिळाली. त्यानंतर काही अंतरावर सडलेला मृतदेह मिळाला. या मृतदेहाच्या शरीरावर असणाऱ्या अंडरविअरवरुन पोलिसांना तो आरिशचाच मृतदेह असल्याची खात्री पटली.
अधिक वाचा - Sonali Phogat : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा गोव्यात मृत्यू, कारण आले समोर
हे गटार आरोपी जितेंद्रच्या घराजवळ असल्याने पोलिसांनी त्याची पुन्हा एकदा चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी जितेंद्र घडाघडा बोलू लागला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.