व्हॉट्सअॅपवरुन शिक्षिकेला अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 25, 2019 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Video call: मध्य प्रदेशच्या पोलिसांनी एका विद्यार्थ्याला २५ वर्षीय शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवरुन अश्लील कॉल करून त्रास देण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

 arrest
शिक्षिकेला अश्लील व्हिडिओ कॉल, विद्यार्थी अटकेत  |  फोटो सौजन्य: Representative Image

इंदूर: मध्य प्रदेशमध्ये सोशल मीडियावरुन लैंगिक शोषण करणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला सायबर सेलच्या टीमने अटक केली आहे. आरोपी विद्यार्थी हा एका मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वर्च्युअल नंबरने २५ वर्षीय शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ कॉल करून गेल्या अनेक दिवसांपासून सतत त्रास देत होता. या घटनेबाबत सायबर सेलचे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंह यांनी अशी माहिती दिली की, 'आरोपीचं नाव रोहित सोनी उर्फ गोलू ( वय १९ वर्ष) असं आहे. तो मूळचा राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो कोटामधील एका कोचिंग सेंटरमधून मेडिकल प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. 

या प्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी असं सांगितलं की,'आरोपीने गुगल प्ले स्टोअरवरुन काही महिन्यांपूर्वी एक खास अॅप डाऊनलोड केलं होतं. ज्याद्वारे तो इंदूरमध्ये राहत असलेल्या शिक्षिकेला अश्लील व्हिडिओ कॉल करायचा. तो मागील तीन महिन्यांपासून असं करत होता. तो महिलेला फक्त अश्लील व्हिडिओ कॉलच नाही तर अश्लील मेसेजही पाठवायचा.' पुढे पोलीस असंही म्हणाले की, 'हे अॅप यूजर्सला विदेशातील वर्च्युअल नंबर निवडण्याची सुविधा देखील देतं. म्हणजेच आरोपी हा आपल्याच मोबाइल फोनमधून शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवरुन अश्लील व्हिडिओ कॉल करायचा. पण यावेळी पीडित महिलेच्या मोबाइलवर नंबर हा अमेरिकेतील कोड असलेला दिसायचा.' 

जेव्हा पीडित शिक्षिका आरोपीचा एक क्रमांक ब्लॉक करायची तेव्हा तो दुसऱ्या क्रमांकावरून तिला कॉल करायचा. यावेळी तो पुन्हा अश्लील कॉलिंग करायचा. अनेकदा तो व्हिडिओ कॉल दरम्यान विवस्त्र देखील व्हायचा. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराला कंटाळून अखेर शिक्षिकेने सहा सप्टेंबरला इंदूरमधील सायबर सेलकडे तक्रार केली. याबाबत जेव्हा पोलिसांनी तपास सुरु केला त्यावेळी त्यांना आरोपी खूपच धूर्त असल्याचं जाणवलं. याबाबत माहिती देताना पोलीस म्हणाले की, 'आरोपी हा आमचा तपास सुरु असताना वारंवार आपला मोबाइल नंबर बदलत असे. आम्ही व्हॉट्सअॅपला सहा वेळा कायदेशीर नोटीस पाठवून संबंधित माहिती देण्याची मागणी केली. पण त्यानंतर देखील आम्हाला माहिती मिळाली नाही. जेव्हा आम्हाला समजलं की, भारतातील व्हॉट्सअॅप अधिकारी आपल्याला माहिती देत नाहीत. त्यानंतर आम्ही व्हॉट्सअॅपच्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील मुख्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणामागील गांभीर्य समजावून सांगितंल. त्यानंतर पुढे आम्हाला हवी असलेली माहिती मिळाली.'

त्यानंतर पोलिसांनी अशीही माहिती दिली की, 'आरोपीने चौकशीदरम्यान मान्य केलं आहे की, तो अश्लील सिनेमा पाहिल्यानंतर महिलांना त्रास द्यायचा. तो व्हॉट्सअॅपवर महिलांचे डीपी (डिस्प्ले पिक्चर) पाहून त्यांना निवडायचा.' दरम्यान आरोपीविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांनी आरोपीचा फोन आणि त्यातील सिम कार्ड देखील जप्त केलं आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
व्हॉट्सअॅपवरुन शिक्षिकेला अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या Description: Video call: मध्य प्रदेशच्या पोलिसांनी एका विद्यार्थ्याला २५ वर्षीय शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवरुन अश्लील कॉल करून त्रास देण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Loading...
Loading...
Loading...