Murder of Father : मुलाने (Son) आपल्या वडिलांच्या (Father) हत्येची (Murder) ऑनलाईन सुपारी (Online contract) दिल्याचं प्रकरण समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवपुरीमध्ये राहणाऱ्या मुलाने बिहारमधील (Bihar) आपल्या वडिलांचा खून करण्यासाठी ऑनलाईन मारेकरी शोधला. त्यासाठी ऑनलाईन सौदा करून हत्येची सुपारी दिली. त्यानंतर वडिलांचा खून करण्यात आला. पोलिसांना या प्रकऱणात अनेक दिवस धागेदोरे सापडत नव्हते, मात्र अखेर या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे.
बिहारमध्ये राहणाऱ्या महेश गुप्ता यांना दोन मुलं होती. त्यातील एक मुलगा सैन्यात होता, तर दुसरा मुलगा दारुडा आहे. सैन्यात असणाऱ्या मुलाला कर्तव्यावर असतानाच वीरमरण आलं होतं. तर दुसरा मुलगा मात्र पूर्णतः वाया गेल्याचं सांगितलं जातं. सतत नशेत असणाऱ्या संतोष नावाच्या मुलाची त्याच्या पत्नीसोबत आणि वडिलांसोबत भांडणं होत होती. संतोषनं आपल्या वडिलांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने इंटरनेटवरून शोध घेत एका मारेकऱ्याशी संपर्क साधला. बिहारमध्येच राहणाऱ्या या मारेकऱ्याने पैशांच्या बदल्यात वडिलांचा खून करण्याची सुपारी घेतली. त्यानंतर काही दिवसांतच गोळ्या घालून महेश गुप्ता यांची हत्या करण्यात आली.
हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांची संतोष अनेक दिवस दिशाभूल करत राहिला. आपल्या वडिलांसोबत काहीजणांचं शत्रुत्व असल्याचं सांगून वेगळ्याच दिशेला तपास जाईल, याची तजवीज तो करत राहिला. मात्र संतोष सांगत असलेल्या कुठल्याच बाबीत तथ्य आढळून येत नसल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय वाढला. त्यानतंर पोलिसांनी संतोषचा या खूनामागे काही हात आहे का, या दृष्टीने तपासाला सुरुवात केली.
अधिक वाचा - Jallianwala Bagh: ऐतिहासिक शहीदी विहिरीत पर्यटकांना नाही टाकता येणार नाणी, जाणून घ्या का टाकयचे नाणे
पोलिसांनी संतोषचे मोबाईल रेकॉर्ड तपासले. त्यावरून बिहारमध्ये काही फोन केले गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याची इंटरनेट हिस्ट्री तपासली असता मारेकऱ्याला सुपारी दिल्याचं पोलिसांना आढळलं. मारेकऱ्याशी संतोषचं झालेलं ऑनलाईन संभाषण आणि पैशांचे व्यवहार याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी संतोषला अटक केली.
संपत्तीच्या लोभापायी संतोषने आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याचं स्पष्ट झालं. संतोषचा भाऊ सैन्यात होता. तो शहीद झाल्यानंतर त्याच्या वडिलांना 1 कोटी रुपये मिळाले होते. वडिलांच्या खात्यावर असणारे हे पैसे लाटण्यासाठी त्यांचा काटा काढण्याचा निर्णय संतोषने घेतला आणि मारेकऱ्याकरवी त्यांचा खून केला. लवकरच आपण कोट्यधीश होऊ आणि आयुष्यभर आरामात जगू, असं त्याचं स्वप्न होतं. मात्र पोलिसांनी त्याचा डाव उघड केल्यामुळे गुन्हा कबूल करण्यावाचून त्याच्याकडे काही पर्यायच उरला नाही. संतोषवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मुलानेच पैशांसाठी वडिलांचा खून केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.