South Korea Supports India : मोदी सरकारच्या निर्णयावर जगभरातून टीका, दक्षिण कोरियानं मात्र केलं समर्थन

गगनाला भिडलेली महागाई आणि गव्हाचं कमी उत्पादन या पार्श्वभूमीवर भारताने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. जगभरातून हा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव येत असताना दक्षिण कोरियानं मात्र भारताचं समर्थन केलं आहे.

South Korea Support India
भारताच्या निर्णयाला दक्षिण कोरियाचा पाठिंबा  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • भारताने 13 मे पासून गव्हावर निर्यातबंदी लादली
  • जगभरातून गव्हावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी दबाव
  • दक्षिण कोरियाने केले भारताचे समर्थन

South Korea Supports India | भारताने (India) गव्हाची निर्यात (Wheat export) करण्यावर बंदी (Ban) घातली असून जगभरातील अनेक देश ही बंदी उठवण्यासाठी भारतावर दबाव आणत आहेत. दक्षिण कोरियाने (South Korea) मात्र मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करून भारतानं देशातील नागरिकांच्या हिताचाच निर्णय घेतल्याचे गौरवोद्गार काढले आहेत. 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची टंचाई

सध्या रशिया आणि युक्रेन यां देशातील संघर्षामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे भारतात महागाईने कळस गाठला असून अन्नधान्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या दोन्ही कारणांचा विचार करून केंद्र सरकारने गव्हावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. जगातील अनेक देशांमध्ये गव्हाची टंचाई निर्माण झाल्यामुळे हे देश मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका करत असून निर्यातबंदी उठवण्याची मागणी करत आहेत. भारत आपल्या भूमिकेवर ठाम असून आता दक्षिण कोरियाने भारताच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. 

जगभरात गव्हाची टंचाई

दक्षिण कोरियाची भूमिका

भारतातील दक्षिण कोरियाचे राजदूत चेंग-जे-बोक यांनी भारताच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. 2030 सालापर्यंत भारत आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही आशियायी देश 5000 कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं आपलं स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भारतानं गव्हावर निर्यातबंदी लादण्याचा निर्णय घेतला असून त्याचा दक्षिण कोरियावर काय परिणाम होऊ शकतो, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर निर्यातबंदी लादणे हा भारताच्या अंतर्गत धोरणाचा प्रश्न असून देशांतर्गत परिस्थितीचा विचार करूनच सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. 

भारत विश्वगुरू

भारत हा केवळ राजकीय मुत्सद्देगिरीच्या बाबतीतच नव्हे, तर व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही विश्वगुरू आणि जागतिक सत्ता असल्याचं दक्षिण कोरियानं म्हटलं आहे. भारत सरकार घेत असलेल्या निर्णयांचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवर परिणाम होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. गहू, साखर आणि इतर साहित्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे आपलं बारीक लक्ष असल्याचंही चेंग-जे-बोक यांनी म्हटलं आहे. 

व्यापार मेळाव्याचं उद्घाटन

दक्षिण कोरियाचे राजदूत चेंग-जे-बोक यांनी पाच दिवसांच्या कोरियन व्यापार मेळाव्याचं उद्घाटन केलं. दक्षिण कोरियातील नवं सरकार आणि भारतातील मोदी सरकार हे परस्पर सहकार्यानं व्यापारवृद्धी करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

जगाच्या नजरा भारताकडे

भारताने गव्हाच्या निर्यातीवर लादलेली बंदी लवकरात लवकर उठवावी, अशी विनंती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी केली आहे. चीनपाठोपाठ सर्वाधिक गव्हाची निर्यात भारतातून करण्यात येते. 13 मे रोजी मोदी सरकारनं गव्हावर निर्यातबंदी घालत असल्याची घोषणा केली होती. देशातील गव्हाचं कमी उत्पादन आणि अन्नधान्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी