Sri Lanka Declares Emergency due to Economic Crisis : कोलंबो : खालावत असलेली अर्थव्यवस्था आणि वाढत असलेली महागाई यामुळे श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली आहे.
श्रीलंकेत अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज १३ तासांपेक्षा जास्त वेळ विजेचे भारनियमन सुरू आहे. शाळा कॉलेजांच्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलून परीक्षांचा खर्च टाळण्यात आला आहे. वीज नाही म्हणून देशातील सर्व रस्त्यांवरचे दिवे बंद करण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल, कोळसा, गॅस यांचा तुटवडा असल्यामुळे श्रीलंकेत ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांचा तसेच औषधांचा तुवटडा आणि वेगाने वाढणारी महागाई यामुळे सामान्यांना जगणे असह्य झाले आहे.
बिकट आर्थिक स्थिती आणि वेगाने वाढणारे बेरोजगार यांच्यामुळे श्रीलंकेत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) यांच्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांना हटविण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागला. यानंतर अध्यक्ष गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेत आणीबाणी लागू केल्याचे जाहीर केले.
आणीबाणी जाहीर झाल्यामुळे श्रीलंकेत सैन्याला विशेषाधिकार मिळाले. कोणतेही कारण न देता तसेच कोर्टात केस दाखल न करता कोणालाही दीर्घकाळ जेलमध्ये ठेवण्याचा अधिकार श्रीलंकेच्या सैन्याला मिळाला आहे.
श्रीलंकेला इंग्रजांकडून १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत एवढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राजधानी कोलंबोसह देशात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू झाली आहे. नागरिकांना संचारबंदीच्या काळात रस्त्यावर येण्यास बंदी आहे.
राजपक्षा आणि त्यांच्या सर्व नातलगांनी सत्तेतील पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी श्रीलंकेचे नागरिक करू लागले आहेत. श्रीलंकेत महागाईचा दर मार्च २०२२ अखेर १८.७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. चलन विनिमयाच्या व्यवस्थेत एक अमेरिकन डॉलर म्हणजे श्रीलंकेचे २९७ रुपये ६५ पैसे तसेच भारताचा एक रुपया म्हणजे श्रीलंकेचे ३ रुपये ९२ पैसे अशी स्थिती आहे. श्रीलंकेच्या चलनाचे अवमूल्यन सुरू आहे.