आर्थिक संकटातल्या श्रीलंकेत रस्त्यांवरचे दिवे बंद करून वीज वाचविण्याचे आदेश

Sri Lanka to turn off street lights as economic crisis deepens : मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत पैसे वाचवण्यासाठी एका मागून एक कठोर निर्णय घेतले जात आहेत. श्रीलंका सरकारने घेतलेल्या ताज्या निर्णयानुसार देशातील सर्व रस्त्यांवरचे दिवे अर्थात पथदिवे (street light) बंद करून वीज वाचविली जाणार आहे.

Sri Lanka to turn off street lights as economic crisis deepens
आर्थिक संकटातल्या श्रीलंकेत रस्त्यांवरचे दिवे बंद करून वीज वाचविण्याचे आदेश 
थोडं पण कामाचं
  • आर्थिक संकटातल्या श्रीलंकेत रस्त्यांवरचे दिवे बंद करून वीज वाचविण्याचे आदेश
  • भारताचा एक रुपया म्हणजे श्रीलंकेचे ३ रुपये ८७ पैसे
  • अमेरिकेचा एक डॉलर म्हणजे श्रीलंकेचे २९३ रुपये ७३ पैसे

Sri Lanka to turn off street lights as economic crisis deepens : कोलंबो : मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत पैसे वाचवण्यासाठी एका मागून एक कठोर निर्णय घेतले जात आहेत. श्रीलंका सरकारने घेतलेल्या ताज्या निर्णयानुसार देशातील सर्व रस्त्यांवरचे दिवे अर्थात पथदिवे (street light) बंद करून वीज वाचविली जाणार आहे.

याआधी श्रीलंका सरकारने देशात धान्य, डाळी, साखर हे पदार्थ सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे (रेशनिंग) वितरित करण्यास सुरवात केली आहे. देशातील सर्व शाळा कॉलेजांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलून श्रीलंका सरकारने परीक्षा आयोजनावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचविला आहे. तसेच श्रीलंका सरकारने सर्व पेट्रोल पंपांवर सशस्त्र जवान नियुक्त करून इंधन वितरणाच्यावेळी होणारे संघर्ष आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

जगातील अनेक देशांप्रमाणे श्रीलंका हा देशही पेट्रोल, डिझेल, कोळसा या ऊर्जास्रोतांसाठी आयातीवर अवलंबून आहे. पण यंदाच्या वर्षी श्रीलंकेला कर्जाचे हप्ते देण्यासाठी म्हणून ४ अब्ज डॉलरची गरज आहे. आधीच कोरोना संकट आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेचा पर्यटन व्यवसाय कोलमडला आहे. परकीय चलनाचा ओघ आटला असताना खर्च सतत वाढत आहे. यामुळे श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर आयात करण्यासाठी निधीची टंचाई आहे. यावर उपाय म्हणून श्रीलंकेने भारताकडून सुमारे एक अब्ज डॉलरची खरेदी उधारीच्या बोलीवर अर्थात क्रेडिट लाइनवर केली आहे. तसेच आयएमएफकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. 

मदत मागितली तरी श्रीलंकेला अद्याप मागणी आणि पुरवठा याचा मेळ घालणे जमलेले नाही. डिझेल आणि कोळश्याअभावी श्रीलंकेत विजेची टंचाई निर्माण झाली आहे. देशभर दररोज तेरा तास भारनियमन अर्थात लोडशेडिंग करण्याची वेळ आली आहे. घरगुती वापरासाठी वीज मिळावी म्हणून श्रीलंका सरकारने देशातील रस्त्यांवरचे दिवे बंद करून वीज वाचविण्याचे आदेश दिले आहेत. 

भारताकडून उधारीवर खरेदी केलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांपैकी सुमारे ५०० दशलक्ष डॉलर रकमेचे डिझेल शनिवारी श्रीलंकेत पोहोचण्याची शक्यत आहे. या डिझेलमुळे श्रीलंकेला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण देशातील वाढती महागाई आणि वेगाने कोसळणारी अर्थव्यवस्था बघता ही मदत किती काळ पुरणार असा प्रश्न श्रीलंका सरकारला सतावत आहे. 

डिझेल मिळाले तर भारनियमन अर्थात लोडशेडिंगचे तास कमी करता येतील अशी आशा श्रीलंका सरकारला वाटत आहे. पण रुसलेला पाऊस आणखी लांबला तर श्रीलंकेचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. देशातील सर्व जलविद्युत निर्मिती प्रकल्पांच्या पाणी साठ्यात विक्रमी घट झाली आहे. या परिस्थितीत भारतातून येणारे डिझेल किती दिवस पुरणार हा एक गंभीर प्रश्न असल्याचे श्रीलंका सरकारच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे. 

विजेअभावी श्रीलंकेच्या शेअर बाजारात दररोज फक्त दोन तास व्यवहार करण्याचा निर्णय झाला आहे. पण दोन दिवसांत तिसऱ्यांदा मोठ्या घसरणीमुळे श्रीलंकेच्या शेअर बाजारातील व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत. 

चलन विनिमयाच्या आजच्या (गुरुवार ३१ मार्च २०२२) दरानुसार भारताचा एक रुपया म्हणजे श्रीलंकेचे ३ रुपये ८७ पैसे तसेच अमेरिकेचा एक डॉलर म्हणजे श्रीलंकेचे २९३ रुपये ७३ पैसे अशी स्थिती आहे. श्रीलंकेच्या चलनाचे अवमूल्यन होत आहे. वाढती महागाई आणि कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंका सरकारसमोरचे आव्हान बिकट होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी