श्रीलंकेत केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा, महिंद्रा राजपक्षा पंतप्रधानपदी कायम

Sri Lankan Cabinet Resign Mahinda Rajapaksa To Remain PM : श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षा आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा हे दोघेही आपापल्या पदांवर कायम आहेत. श्रीलंकेत १ एप्रिल २०२२ पासून आणीबाणी लागू आहे. सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सैन्याला विशेषाधिकार मिळाले आहेत.

Sri Lankan Cabinet Resign Mahinda Rajapaksa To Remain PM
श्रीलंकेत केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रीलंकेत केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा
  • महिंद्रा राजपक्षा पंतप्रधानपदी कायम
  • राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा पदावर कायम

Sri Lankan Cabinet Resign Mahinda Rajapaksa To Remain PM : कोलंबो : वाढती महागाई आणि कोसळत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंका अडचणीत सापडली आहे. नागरिकांची नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षा (Prime Minister Mahinda Rajapaksa) आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) हे दोघेही आपापल्या पदांवर कायम आहेत. श्रीलंकेत १ एप्रिल २०२२ पासून आणीबाणी लागू आहे. आणीबाणी लागू असल्यामुळे श्रीलंकेत सैन्याला विशेषाधिकार मिळाले आहेत. कोणतेही कारण न देता तसेच कोर्टात केस दाखल न करता कोणालाही दीर्घकाळ जेलमध्ये ठेवण्याचा अधिकार श्रीलंकेच्या सैन्याला मिळाला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे कारण देत श्रीलंकेत सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेत अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज १३ तासांपेक्षा जास्त वेळ विजेचे भारनियमन सुरू आहे. शाळा कॉलेजांच्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलून परीक्षांचा खर्च टाळण्यात आला आहे. वीज नाही म्हणून देशातील सर्व रस्त्यांवरचे दिवे बंद करण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल, कोळसा, गॅस यांचा तुटवडा असल्यामुळे श्रीलंकेत ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांचा तसेच औषधांचा तुवटडा आणि वेगाने वाढणारी महागाई यामुळे सामान्यांना जगणे असह्य झाले आहे. बिकट आर्थिक स्थिती आणि वेगाने वाढणारे बेरोजगार यांच्यामुळे श्रीलंकेत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अध्यक्ष गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) यांच्या निवासस्थानाबाहेर तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी बळाचा वापर करून आंदोलकांना पळवून लावण्यात आले. 

श्रीलंकेच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू आहे. ज्या भागांमध्ये संचारबंदी शिथील केली आहे अशा ठिकाणी रस्त्यांवर मोठा बंदोबस्त दिसत आहे. रस्ते, पेट्रोल पंप, सर्व महत्त्वाची ठिकाणे येथे सशस्त्र जवानांचा वावर प्रकर्षाने जाणवत आहे.

इंग्रजांकडून श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी