गोटाबाया राजपक्षा यांचे श्रीलंकेतून पलायन, मालदीवमध्ये घेतला आश्रय

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa flies out of country and lands in Maldives : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी देशातून पलायन करून मालदीवमध्ये आश्रय घेतल्याचे वृत्त आहे.

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa flies out of country and lands in Maldives
गोटाबाया राजपक्षा यांचे श्रीलंकेतून पलायन, मालदीवमध्ये घेतला आश्रय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गोटाबाया राजपक्षा यांचे श्रीलंकेतून पलायन, मालदीवमध्ये घेतला आश्रय
  • आज दिवसभरात गोटाबाया राजपक्षा यांचा राजीनामा जाहीर होण्याची शक्यता
  • श्रीलंका आर्थिक संकटात

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa flies out of country and lands in Maldives : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी देशातून पलायन करून मालदीवमध्ये आश्रय घेतल्याचे वृत्त आहे. वाढत्या आर्थिक संकटाने त्रस्त श्रीलंकेतील नागरिकांचा तीव्र विरोध पाहून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी देश सोडला आहे. आज दिवसभरात त्यांचा राजीनामा जाहीर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा ७३ वर्षांचे आहेत. त्यांनी पत्नी आणि एका अंगरक्षकासह अँटोनोव्ह ३२ या विशेष विमानातून देश सोडला. कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण केले. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांनी देश सोडला अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

जेमतेम दोन कोटी सोळा लाख लोकसंख्या असलेली श्रीलंका आर्थिक संकटात सापडली आहे. आयात करण्यासाठी श्रीलंकेकडे पुरेसे विदेशी चलन नाही. चिनी प्रकल्प आणि सरकारचे अवास्तव सवलती आणि करमाफी देण्याचे धोरण यामुळे श्रीलंका सरकारकडे देश चालविण्यासाठी पुरेसा पैसा उरलेला नाही. अमेरिकेच्या एका डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेचे ३६० रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रीलंकेच्या चलनाचे अवमूल्यन झाले आहे. आर्थिक संकटाने त्रस्त नागरिकांनी या सर्व परिस्थितीसाठी दोषी ठरवत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांच्या सरकारी निवासस्थानावर शनिवार ९ जुलै २०२२ रोजी हल्ला केला. असंख्य संतप्त नागरिक राष्ट्रपती निवासस्थानाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी पलायन केले. ते राष्ट्रपती निवासस्थान सोडून एका अज्ञात आणि सुरक्षित ठिकाणाकडे रवाना झाले. परिस्थिती थोडी सावरल्याचे पाहून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा कोलंबो विमानळावर आले आणि तिथून विमानातून निघून गेले. 

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राजकीय पातळीवर श्रीलंकेत प्रयत्न सुरू आहेत. श्रीलंकेच्या संसदेचे विशेष अधिवेशन शुक्रवार १५ जुलै २०२२ रोजी होणार आहे. या अधिवेशनात आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी काय करावे यावर चर्चा होईल. तसेच मंगळवार १९ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती पदासाठी इच्छुक उमेदवार अर्ज सादर करतील. बुधवार २० जुलै २०२२ रोजी नव्या राष्ट्रपतींची निवड केली जाईल. नवे राष्ट्रपती देशाची सूत्रं हाती घेतील. यानंतर श्रीलंकेत एक सर्वपक्षीय सरकार स्थापन केला जाईल. या सरकारला राष्ट्रपती शपथ देतील. नव्या सरकारची जबाबदारी श्रीलंकेला आर्थिक संकटातून सावरणे ही असेल. श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने (Mahinda Yapa Abeywardena) यांनी ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी