श्रीलंकेत सत्तांतर होणार, संध्याकाळी सत्तांतराबाबत महत्त्वाची बैठक

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa to hold crucial meeting with 41 MPs : श्रीलंकेत सत्ताधाऱ्यांविरुद्धची नाराजी वाढली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि देशात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परस्पर सामंजस्यातून सत्तांतराची तयारी सुरू झाली आहे.

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa to hold crucial meeting with 41 MPs
श्रीलंकेत सत्तांतर होणार, संध्याकाळी सत्तांतराबाबत महत्त्वाची बैठक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • श्रीलंकेत सत्तांतर होणार, संध्याकाळी सत्तांतराबाबत महत्त्वाची बैठक
  • परस्पर सामंजस्यातून सत्तांतराची तयारी सुरू
  • राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा यांनी बोलाविली ४१ संसद सदस्यांची बैठक

Sri Lankan President Gotabaya Rajapaksa to hold crucial meeting with 41 MPs : कोलंबो : वाढती महागाई आणि कोसळणारी अर्थव्यवस्था यामुळे श्रीलंकेत सत्ताधाऱ्यांविरुद्धची नाराजी वाढली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि देशात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परस्पर सामंजस्यातून सत्तांतराची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) यांनी संसदेतील ४१ प्रमुख खासदारांना संध्याकाळी एका विशेष बैठकीसाठी बोलावले आहे. ही बैठक संध्याकाळी सात वाजता होणार आहे. 

इम्रान खानचं पाकिस्तान सरकार पडलं, शाहबाज शरीफ होणार नवे पंतप्रधान

श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल २०२२च्या सुरुवातीलाच राजीनामा दिला. एकदम २६ मंत्र्यांनी राजीनामा दिला. पण पंतप्रधान महिंद्रा राजपक्षा (Prime Minister Mahinda Rajapaksa) आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) हे दोघेही आपापल्या पदांवर कायम आहेत. नागरिकांमध्ये याच कारणामुळे नाराजी आहे. राजपक्षा कुटुंब आणि त्यांच्याशी नाते असलेली कोणतीही व्यक्ती सत्तेत नको, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. देशात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीचा अंदाज येऊ लागल्यामुळे सत्तांतर करण्यासाठी तसेच सत्ता सोडल्यानंतर राजपक्षा कुटुंबातील कोणालाही नव्या सरकारकडून त्रास होऊ नये यासाठी चर्चा होणार असल्याचे समजते. 

राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेसमोरच्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व पक्षीय सहकार्याच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षा (President Gotabaya Rajapaksa) यांनी संसदेतील ४१ प्रमुख खासदारांना संध्याकाळी एका विशेष बैठकीसाठी बोलावले आहे. बैठकीला श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेरना उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. 

श्रीलंकेत अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज दीर्घकाळ विजेचे भारनियमन सुरू आहे. शाळा कॉलेजांच्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलून परीक्षांचा खर्च टाळण्यात आला आहे. वीज नाही म्हणून देशातील सर्व रस्त्यांवरचे दिवे बंद करण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल, कोळसा, गॅस यांचा तुटवडा असल्यामुळे श्रीलंकेत ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांचा तसेच औषधांचा तुवटडा आणि वेगाने वाढणारी महागाई यामुळे सामान्यांना जगणे असह्य झाले आहे. बिकट आर्थिक स्थिती आणि वेगाने वाढणारे बेरोजगार यांच्यामुळे श्रीलंकेत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

श्रीलंकेत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी बळाचा वापर करून आंदोलकांना पळवून लावण्यात आले. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार संचारबंदी लागू केली जात आहे. श्रीलंकेतील अनेक महत्त्वाचे रस्ते, महत्त्वाची ठिकाणे येथे बंदोबस्त आहे. पेट्रोल पंपांवर सशस्त्र जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्रजांकडून श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कर्जाचा बोजा, परकीय गंगाजळीचा अभाव, देशाच्या चलनाचे दररोज होत असलेले अवमूल्यन, वाढती महागाई आणि या सर्व कारणांमुळे कोसळत असलेली अर्थव्यवस्था अशा चक्रव्युहात श्रीलंका अडकली आहे. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी एका सर्व पक्षीय सरकारच्या स्थापनेबाबत राष्ट्रपती विशेष बैठकीत चर्चा करणार असल्याचे समजते. नागरिकांच्या नाराजीची दखल घेऊन राष्ट्रपतींनी विशेष बैठक बोलाविली आहे. नव्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाचे किती प्रतिनिधी असतील, कोण सरकारमध्ये नसेल तसेच नवे सरकार प्राधान्याने काय करणार अशा अनेक मुद्यांवर विशेष बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी