10th-12th Class news । मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच राज्यातील इतर मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पहिली ते नववी आणि अकरावीचे शालेय वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये न जाता ऑनलाइनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी 'माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी' अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामध्ये दहावी, बारावीचे वर्गही ऑनलाइनच भरावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Also Read : 10th, 12th Result : ICSE बोर्डाच्या दहावी- बारावीचा निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यामध्ये पहिली ते बारावीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाची तिसरी लाट आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने १ ते ९ आणि ११ वी चे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. त्यात आता दहावी, बारावीची भर पडणार आहे. आता ह वर्गही ऑनलाइनच भरणार आहेत. दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाइन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज सरकारला सादर करावी, असे निर्देश प्रा. गायकवाड यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.