बिहार: शिव मंदिरात चेंगराचेंगरी (Stampede )झाल्याची बातमी समोर येतेय. या चेंगराचेंगरीमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात ही घटना घडली आहे. बिहार राज्यात आजपासून श्रावण महिना साजरा करण्यात येतो. त्यामुळे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी झालेल्या या अपघातात इतर भाविकही जखमी झाले आहेत. सध्या जखमी भाविकांना तातडीनं रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिसवान ब्लॉकमधील प्रसिद्ध बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात जलाभिषेकादरम्यान ही घटना घडली.
कोरोनानंतर मंदिरात पहिल्यांदाच आज श्रावणातल्या पहिल्या सोमवारी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी बाचाबाची झाली आणि त्यानंतर भाविकांची चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरी दरम्यान काही महिला जमिनीवर पडल्या आणि गर्दी असल्यानं त्यांना उठता ही आलं नाही, असं सांगितलं जातंय. यातच दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचा प्रार्दुभाव होता. त्यामुळे कोरोनाच्या काळात मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षांचा काळ उलटल्यानंतर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनावर गलथानपणाचा आरोप केला आहे.
मृत महिलांची नावं
लीलावती देवी - वय वर्ष 42, प्रतापपूर गावातील रहिवासी.
सुहागमती देवी - वय वर्ष 40, पाथर गावची रहिवासी
अधिक वाचा- राज्यात पावसाचं धुमशान सुरूच, अतिवृष्टीचे 104 बळी; 275 गावांना पुराचा फटका
जखमी महिला
शिवकुमारी देवी, सहदुल्लेपूर गावची रहिवासी
अंजुरिया देवी, प्रतापपूर गावची रहिवासी