राममंदिरात लागणार राजस्थानच्या या गावचा दगड, मकराना येथील संगमरवराने बनणार मुख्यद्वार

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 04, 2020 | 17:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

अयोध्येत बनणाऱ्या राममंदिराचे राजस्थानच्या जमिनीशी जवळचे नाते आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर बनवण्यासाठी लागणारा दगड राजस्थानातील बंसी पहाडपूर इथला आहे आणि मकराना येथील संगमरवराने या मंदिराचे मुख्य द्वार बनणार आहे

Ramjanmabhoomi Mandir
राम जन्मभूमी मंदिर 
थोडं पण कामाचं
  • भरतपूरच्या रुदावल क्षेत्रात वसले आहे बंसी पहाडपूर
  • आपल्या लाल दगडासाठी प्रसिध्द आहे हे गाव
  • संगमरवरासाठी प्रसिध्द आहे मकराना, ताजमहालातही वापरला आहे हाच दगड

Shri Ramjanmabhoomi Mandir Ayodhya: अयोध्येत (Ayodhya) बनणाऱ्या राममंदिराचे (Ram Mandir) राजस्थानच्या (Rajasthan) जमिनीशी जवळचे नाते आहे. ज्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमीपूजनासाठी सर्वजण उत्साहित आहेत, त्याच्या निर्माणासाठी वापरायचा दगड राजस्थानातील एका गावातून रवाना झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पाच ऑगस्ट रोजी रामल्लाच्या मंदिराची कोनशीला (foundation stone) ठेवणार आहेत आणि यासोबतच 500 वर्षांच्या या संघर्षाचाही अंत होईल. 2.75 लाख घन मीटर इतक्या भूभागावर बांधल्या जाणाऱ्या या मंदिरासाठी राजस्थानच्या भरतपूर (Bharatpur) येथील रुदावल क्षेत्रातील बंसी पहाडपूर या गावातही कामाला वेग आला आहे.

शेकडो कामगार इथे रात्रंदिवस लाल दगडांवर नक्षीकाम करत आहेत. भरतपूरच्या या गावातले दगड देशातील अनेक इमारतींमध्ये वापरण्यात येतात. या दगडांच्या काही खास गुणांमुळे हा दगड राममंदिरासाठी निवडण्यात आला आहे. या दगडाची चमक दीर्घ काळापर्यंत टिकून राहते आणि मानण्यात येते की हा दगड 5000 वर्षांपर्यंत टिकतो. या दगडावर पाणी पडल्यास याची चमक आणखी वाढते असेही मानले जाते. बंसी पहाडपूर इथून राममंदिराच्या बांधकामासाठी दगड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मुख्यद्वाराचा दगड मकरानाचा

राममंदिराच्या मुख्यद्वारासाठी पांढरे संगमरवर वापरण्यात येणार आहे. मकराना हा राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे आणि येथील संगमरवर जगप्रसिध्द आहे.  ताजमहाल बांधण्यासाठीही मकरानाचे संगमरवर वापरण्यात आल्याचे मानले जाते. मकरानामध्ये विविध ठिकाणी संगमरवराच्या खाणी आहेत.

असे असेल भव्य मंदिर

प्रस्तावित मॉडेलनुसार दोन मजली असणाऱ्या या राममंदिराची लांबी 270 फूट, रुंदी 140 फूट आणि उंची 128 फूट असेल. यात 330 बीम आणि दोन्ही मजल्यांवर प्रत्येकी 106, म्हणजे एकूण 212 खांब असतील. या मंदिराचे एकूण पाच दरवाजे असतील आणि हे दरवाजे मंदिराच्या पाच भागांमध्ये म्हणजेच गर्भगृह, कौली, रंगमंडप, नृत्यमंडप आणि सिंहद्वार येथे असतील. गर्भगृहाच्या बरोबर वरच्या बाजुला 16.3 फुटांचा प्रकोष्ठ बनवण्यात येईल, ज्यावर 65.3 फूट उंचीचे शिखर असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी