अवघ्या सहा महिन्यात भाजपची जबरदस्त पीछेहाट, मोदी-शाहांची जादू कमी झाली? 

झारखंडमध्ये भाजपला सपशेल पराभव स्वीकारावा लागल्याने आता मोदी आणि शहा यांची जादू कमी झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

strong setback to bjp in just six months modi shah's magic has diminished
अवघ्या सहा महिन्यात भाजपची जबरदस्त पीछेहाट, मोदी-शाहांची जादू कमी झाली?   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने गमावली दोन महत्त्वाची राज्यं
  • महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप विरोधी पक्षात
  • झारखंडमध्ये भाजपचा सपशेल पराभव, सोरेन सरकार सत्तेत येणार

मुंबई: लोकसभा २०१९ निवडणुकीत भाजपला अतिशय मोठं यश मिळालं होतं. २०१४ च्या लोकसभाच्या निवडणुकीपेक्षाही अधिक मोठं यश यावेळी भाजपला मिळाल्या. त्यामुळे संपूर्ण देशात मोदींची जादू कायम आहे असंच म्हटलं जात होतं. पण असं असतानाच अवघ्या सहाच महिन्यात मोदी-शाहा यांची जादू कमी झाली की काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीत भरभरुन यश मिळविणाऱ्या भाजपला दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. ही राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि झारखंड. 

खरं तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत होतं. पण एकट्या भाजपला महाराष्ट्रात १०५ जागाच मिळाल्या. २०१४ विधानसभेच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये बरीच घसरण झाली. निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपकडून राज्यभरात असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळेल. पण महाराष्ट्रातील जनतेने भाजपला अनपेक्षित असा कौल दिला. त्यामुळे सत्तेसाठी त्यांना शिवसेनेसोबत जाणं अपरिहार्य होतं. पण शिवसेनेने  मुख्यमंत्रिपदावर दावा केला. जो भाजपने मान्य केला नाही. अखेर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि भाजपला थेट विरोधी पक्षात बसावं लागलं. 

महाराष्ट्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्यात भाजपची पीछेहाट होऊन महिनाही झालेला नसताना आज (सोमवार) भाजपला दुसरा मोठा धक्का बसला. तो म्हणजे झारखंडमधील सत्ता भाजपला गमवावी लागली आहे. कारण विधानसभा निवडणुकीत झारखंडच्या मतदारांनी सपशेल नाकारल्याचं दिसतं आहे. कारण की, येथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युतीला बहुमत मिळत असल्याचं दिसतं आहे. 

खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जोरदार प्रचार केला होता. यावेळी दोन्ही दिग्गज नेत्यांनी झंझावाती सभा घेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यासाठी तुफान प्रचार केला होता. पण दोन्हीही राज्यात मोदी-शाहा यांची जादू चाललीच नाही. महाराष्ट्रात जनतेने भाजपला सर्वाधिका जागा दिल्या तरी बहुमतापर्यंत पोहचवलं नाही. तर झारखंडमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला थेट पराभवच स्वीकारावा लागला. 

सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यापासून नरेंद्र मोदी यांचा एक वेगळा करिश्मा आजवर सगळ्यांना पाहायला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नावाचा करिष्माही दिसून आला होता. दुसरीकडे २०१४ लोकसभा निवडणुकीपासून भाजपचे चाणक्य अशी अमित शाहा यांची ओळख देशभरात निर्माण झाली होती. निवडणुका जिंकण्यासाठी अत्यंत अचूक अशी आखणी अमित शाहा करतात अशी त्यांची ख्याती आहे. पण महाराष्ट्र आणि झारखंड या दोनही राज्यांमध्ये त्यांना भाजपला विजय मिळवून देता आला नाही. तसंच मोदींच्या नावाचा करिष्माही दोन्ही राज्यात भाजपला तारु शकला नाही. 

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्याच्या अंतराने भाजपला दोन मोठ्या राज्यातील विधानसभेत थेट विरोधी पक्षात जाऊन बसावं लागलं आहे. त्यामुळे आता गेली पाच वर्ष मोदी-शाहा यांच्या जीवावर निवडणुका जिंकणाऱ्या भाजपला आता खरोखरच आत्मचिंतन करावं लागणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी