Supreme Court hearing : शिवसेना हा राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंचा कि एकनाथ शिंदेंचा हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी बुधवार ३ ऑगस्ट २०२२ रोजी सुनावणी होणार आहे.
याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वात आहे तीच खरी शिवसेना असा दावा केला. निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केला. हे पत्र मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना शुक्रवार ८ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचे म्हणणे निवडणूक आयोगासमोर मांडण्यास नोटीस बजावली. दोन्ही बाजूंना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या नोटीस विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
एकनाथ शिंदे आणि इतर १५ आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह या विषयावर सुनावणी घेणे योग्य होणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या नोटीसला स्थगिती द्यावी अशी मागणी करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या मागणी संदर्भातील सुनावणी बुधवार ३ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे.
सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठापुढे सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय आता ३ ऑगस्टला होणार आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंनी शपथपत्र दाखल केले आहे. कुठल्या घटनात्मक बाबींवर सुनावणी हवी याबाबत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ३ ऑगस्ट रोजी होतील. यानंतर निवडणूक आयोगाच्या नोटीसला स्थगिती मिळणार की नाही या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे शिवसेनेच्या दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदारांचा आणि खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत, असेही एकनाथ शिंदे सांगत आहेत. याच कारणामुळे खरी शिवसेना ही आपल्याच नेतृत्वात अस्तित्वात असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केला आहे.
शिवसेना कोणाची हा प्रश्न सुटण्याआधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. याआधी ईडीच्या पथकाने मुंबईत संजय राऊत यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या मालमत्तांची तपासणी केली. तसेच संजय राऊत यांची सुमारे नऊ तास भांडुपच्या घरात कसून चौकशी केली. यानंतर पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.