उन्नाव बलात्कार: पीडितेच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा सुनावणीच्या आदल्या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू

Unnao Rape Case: उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या वडिलांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉ. प्रशांत उपाध्याय यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे.

 suspected death of doctor treating victim's father doctor dies on the day before court hearing
उन्नाव बलात्कार: पीडितेच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा सुनावणीच्या आदल्या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू   |  फोटो सौजन्य: Times Now

उन्नाव: उत्तर प्रदेशमधील उन्नाव बलात्कार प्रकरणाची चर्चा देशभरात झाली होती. पण आता याच प्रकरणातील एक नवी आणि अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्कार पीडित तरुणीच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. या डॉक्टरचं नाव प्रशांत उपाध्याय असल्याचं समजतं आहे. हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी बलात्कार पीडितेच्या वडिलांवर उपचार केले होते जेव्हा त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. तेव्हा डॉक्टर प्रशांत जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये तैनात होते. त्यांनी प्राथमिक उपचारानंतर बलात्कार पीडितेच्या वडिलांना सुट्टी दिली होती आणि काही तासांनी पोलिसांच्या ताब्यात असतानाचा त्यांचा संशयस्पदरित्या मृत्यू झाला होता. 

जेव्हा पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर सीबीआय चौकशीत डॉक्टर फ्रशांत यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना १२ एप्रिल २०१८ ला निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंत जवळजवळ ९ महिन्यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं आणि फतेहपूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांना रुजू होण्यास सांगण्यात आलं. मूळचे लखनौचे असणाऱ्या डॉक्टर प्रशांत यांची आज (सोमवार) सकाळच्या सुमारास अचानक तब्येत बिघडली. ज्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले. 

बलात्कार पीडिताच्या वडिलांच्या मृत्यूशी निगडीत प्रकरणावर उद्या (मंगळवार) कोर्टात सुनावणी होणार होती. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर उपाध्याय यांना सोमवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पण त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. पण जेव्हा त्यांचा त्रास अधिक वाढू लागला तेव्हा त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत यांना मधुमेह देखील होता. दरम्यान, त्यांचं शव पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आलं आहे. 

दरम्यान, दिल्लीच्या एका कोर्टाने उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कोर्टाने सेंगरला २५ लाखांचा दंड ठोठावला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी