Pakistan News | नवी दिल्ली : भारताचा शेजारील देश पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान पाकिस्तानचे मंत्री अहसान इक्बाल यांनी देशातील नागरिकांना अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली ठेवण्यासाठी कमी चहा पिण्याचे आवाहन केले आहे. मंत्री एहसान इक्बाल म्हणाले की, पाकिस्तानी नागरिक दररोज एक किंवा दोन कप चहाचा वापर कमी करू शकतात, कारण चहाच्या आयातीमुळे पाकिस्तान सरकारवर अतिरिक्त आर्थिक दबाव येत आहे. (Tea cut will improve Pakistan's economy, says Ahsan Iqbal).
अधिक वाचा : ऐकलं का! एका पाण्याच्या बाटलीची किंमत तब्बल ६५ लाख रूपये
मंत्री एहसान इक्बाल यांनी पत्रकारांना सांगितले की, देश कर्ज घेऊन चहा आयात करत आहे. आउटगोइंग आर्थिक वर्षाच्या फेडरल बजेट दस्तऐवजात असे दिसून आले आहे की पाकिस्तानने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३ अब्ज रुपयांचा अतिरिक्त चहा आयात केला आहे.
२०१९ मध्ये दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या ६ अब्ज बेलआउट करारावर पुन्हा चर्चा करण्यासाठी आयएमएफला (IMF) राजी करण्यासाठी पाक सरकारने मागील आठवड्यात २०२२-२३ साठी ४७ बिलियन डॉलर्सचे नवीन बजेट अनावरण केले आहे. ऑब्झर्व्हेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटीनुसार, २२ कोटी असलेला दक्षिण आशियाई देश हा जगातील सर्वात मोठा चहा आयातदार आहे, ज्याची किंमत २०२० मध्ये ६४ कोटींहून जास्त आहे.
पाकिस्तानला मागील अनेक महिन्यांपासून गंभीर आर्थिक समस्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे देशातील अन्न, वायू आणि तेलाच्या किमती वाढल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात झपाट्याने घट होत आहे.