EV Blast : हैद्राबाद : गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाला असून त्यात एका ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगाणाच्या निजामाबाद भागात १९ एप्रिल रोजी बी प्रकाश यांनी आपल्या राहत्या घरात इलेक्ट्रिक वेहिकलची बॅटरी चार्जिंगला लावली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी ही स्कूटर चार्जिंगला लावली होती. रात्री बी प्रकाश यांचे वडील रामास्वामी, आई कमलअम्मा आणि मिलगा कल्याण हॉलमध्येच झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली. यात रामास्वामी गंभीर जखमी झाले. तसेच कमलअम्मा आणि कल्याण हे दोघेही जखमी झाले.
गंभीर जखमी झालेल्या रामास्वामी यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पोलिसांनी Pure EV या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बनवताना सर्व नियमांचे पालन केले नव्हते असा आरोप रामास्वामी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या सगळीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. पेट्रोल डिझेल महाग होत असल्याने ग्राहकांचा कल या इलेक्ट्रिक वेहिकलकडे आहे. सरकारकडूनही या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल ऐवजी वीज लागत असल्याने या गाड्यांमुळे प्रदुषण होत नाही. असे असले तरी या गाड्यांचे काही दुष्परिणाम समोर येत आहे. ओलाने नुकतंच आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. या गाडीसाठी जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले तेव्हा ओलाची साईट डाऊन झाली होती. आता ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे ग्राहकांमध्ये एकच भिती पसरली आहे. ओला कंपनीने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. कंपनीने जारी केलेल्या सूचनेनुसार हा व्हिडीओ कंपनीच्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. या घटनेचा तपास केला जाईल. तसेच ग्राहकांची सुरक्षिता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
Ola S1 Pro electric scooter मध्ये ३3.97kWh लिथियम आयोने बॅटरी असते. ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहन आणि इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये वापरली जाते. जेव्हा ही बॅटरी व्यवस्थित बनवली जात नाही तेव्हा या बॅटरीला आग लागते. तसेच ही बॅटरी चालवण्यासाठी योग्य सॉफ्टवेअर नसल्यास आग लागते अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.