President Elections 2022 : हा नेता राष्ट्रपती झाला, तर देशात दहशतवाद वाढेल ! भाजप नेत्याचा विरोधकांवर थेट आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप खासदार दिलीप घोष यांनी टीका केली आहे. हा नेता राष्ट्रपती झाला, तर देशात दहशतवाद वाढेल, असं विधान त्यांनी केलं आहे.

President Elections 2022
हा नेता राष्ट्रपती झाला तर दहशतवाद वाढेल, भाजप नेत्याचा आरोप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हा नेता राष्ट्रपती झाला तर देशात दहशतवाद वाढेल
  • भाजप नेते दिलीप घोष यांचा आरोप
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर कडाडून टीका

President Elections 2022 : भारतातील विरोधी पक्षांनी एकमतानं ज्या नेत्याचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं होतं, ती व्यक्ती जर खऱोखरच राष्ट्रपती झाली तर देशात दहशतवाद वाढेल, असा आरोप भाजप खासदार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले घोष पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ज्या उमेदवाराचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं आहे, त्या नेत्यचे दहशतवाद्यांसोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप घोष यांनी केला. 

शरद पवारांवर निशाणा

भाजप खासदार दिलीप घोष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट नाव घेऊन निशाणा साधला आहे. शरद पवार यांचे नेहमीच दहशतवाद्यांशी संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत जर ते राष्ट्रपती झाले, तर देशातील दहशतवादाला एक प्रकारे खतपाणीच मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. देशातील जनतेला कुणीही मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणत त्यांनी ममता बॅनर्जींवरही टीका केली आहे. अर्थात स्वतः शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरायला नकार दिला आहे. आपल्याला राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यात काहीही रस नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

आधिक वाचा - Confusion over Agneepath :अग्निपथ योजनेतील हे गैरसमज सरकारने केले दूर, विरोध करण्याअगोदर तरतूदी समजून घेण्याचा दावा

ममता बॅनर्जींवर टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय नेत्या होण्याची स्वप्नं पडत असल्याची टीका घोष यांनी केली आहे. वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक नेत्यांना गोळा करून केंद्रातील भाजप सरकारविरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी करत आहेत. मात्र त्यात त्यांना कदापि यश येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठीच त्या वेगवेगळे दावे करतात, बैठका घेतात आणि चर्चा करत राहतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

विरोधकांच्या एकजुटीवर टीका

विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न कसे फसतात, हे 2019 साली देशानं पाहिलं होतं, असं घोष यांनी म्हटलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एक मोठी सभा पार पडली होती. या सभेला देशातील सगळे दिग्गज विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र प्रत्यक्ष निवढणुकीत काय घडलं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्यावेळी एकत्र आलेले नेते आज कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे. वास्तविक कुठल्याच पक्षाकडे विश्वासार्ह नेतृत्व नसल्यामुळे भाजपविरोधात एकत्र येण्याचा काही उपयोग होणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. जनतेनं ज्यांना अगोदरच नाकारलं आहे, ते सगळे एकत्र आले तरी जनता त्यांना नाकारतच राहिल, असा युक्तीवाद त्यांनी केला. 

अधिक वाचा - Origin of Black Death Pandemic : 200 कोटी लोकांचा जीव घेणाऱ्या साथीचे मूळ सापडले, 700 वर्षांनी उकलणार ‘ब्लॅक डेथ’चं गूढ

लोकसभेची तयारी

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं लोकसभेची तयारी सुरू केली असून सर्व 42 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं घोष म्हणाले. 2024 च्या लोकसभेत पश्चिम बंगालमध्ये भाजप हा सर्वात यशस्वी पक्ष असेल, असा दावा त्यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी