नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दोन तासांच्या आत तीन दहशतवादी (Terror Incident) घटना घडल्या. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून उपराज्यपाल मनोज सिन्हा (Lieutenant Governor Manoj Sinha)यांनीही या घटनांवर शोक व्यक्त केला आहे. पहिली घटना श्रीनगरमधील (Srinagar)इक्बाल पार्कजवळ घडली. श्रीनगरच्या बाहेरील हवल येथील मदीन साहिबजवळ दुसरी हत्या झाली तर तिसरी घटना उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात घडली आहे.
दहशतवाद्यांनी संध्याकाळी सात वाजता इकबाल पार्क परिसरात श्रीनगरमधील प्रसिद्ध औषध विक्रेते मलिक माखनलाल बिंदरू यांची गोळी मारून हत्या केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी बिंदरू (68) यांना जवळून गोळी मारली जेव्हा ते आपल्या दुकानात होते. पोलिस अधिकारी पुढे म्हणाले, गोळी लागल्यानंतर बिंदरू यांना रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बिंदरू काश्मिरी पंडित समुदायातील अशा गटात सहभागी होते ज्यांनी 1990 नंतर काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यानंतर देखील पळ काढला नाही. बिंदरू आपल्या पत्नीसोबत काश्मिरमध्ये राहिले आणि आपला औषधांचा व्यवसाय सुरू ठेवला.
बिंदरू यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर साडे आठच्या दरम्यान दहशतवाद्यांनी लाल बाजार येथे पाणीपुरी विक्रेत्याची हत्या केली. ज्या पाणीपुरी विक्रेत्याची हत्या केली ती व्यक्ती जम्मू काश्मिरची रहिवासी नाही. जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, श्रीनगरमध्ये एका गरीब पाणीपुरीवाल्यावर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. "या घटनेवर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो, अशी मी प्रार्थना करतो."
त्यानंतर आठ वाजून 45 मिनिटानी दहशतवाद्यांनी बांदीपोरा येथील शाहगुंड परिसरात एक सामान्य नागरिकाची हत्या केली आहे. मोहम्मद शफी लोन असे मृत व्यक्तचे नाव आहे. या तीन घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांनी पकडण्यासाठी चौकशी सुरू आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दरम्यान, माखन लाल बिंदरू प्रसिद्ध औषध विक्रेते होते. तसेच जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यानंतरही ते येथून गेले नाही. ते आपल्या पत्नीसह श्रीनगरमध्ये राहत होते आणि त्यांनी आपली फार्मसी बिंदरू मेडीकेट चालवत होते. काश्मिरी पंडित समाजातील अनेक लोकांनी 1990 मध्येच श्रीनगर सोडले होते.