ATSची मोठी कारवाई, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक

अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मोहम्मद कलीमुद्दीन मुजाहिरी याला झारखंड एटीएसने अटक केली आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथून मुजाहिरी याला अटक करण्यात आली आहे.

terrorist kalimuddin mujahiri al qaeda arrest jharkhand tatanagar railway station
ATSची मोठी कारवाई, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक 

थोडं पण कामाचं

  • अल-कायद्याचा दहशतवाद्याला अटक
  • आत्मघातकी हल्ल्यांसाठी तरुणांना देत होता प्रशिक्षण
  • झारखंड एटीएसची कारवाई

रांची: झारखंड एटीएसने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद कलीमुद्दीन मुजाहिरी याला अटक केली आहे. एटीएसच्या टीमने जमशेदपूर रेल्वे स्टेशनजवळून दहशतवादी मुजाहिरी याला अटक केली आहे. दहशतवादी संघटना अल-कायदासाठी कार्यरत असलेल्या कलीमुद्दीन मुजाहिरी हा गेल्या तीन वर्षांपासून फरार होता आणि आपली ठिकाणी बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता.

मुजाहिरी हा अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य होता, त्याला केलेली अटक हे एटीएसचं मोठं यश आहे. एटीएसच्या पोलीस अधिक्षक विजया लक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. विजया लक्ष्मी यांनी पुढे म्हटलं की, दहशतवादी कलीमुद्दीन मुजाहिरी याचा सहयोगी असलेला मोहम्मद अब्दुल रहमान अली खान आणि हैदर उर्फ मसूद उत्कट हे दोघेही तिहाड जेलमध्ये बंद आहेत. त्यासोबतच अब्दुल समी उर्फ आसन, अहमद मसूद अकरम, राजू, नसीम अख्तर आणि झिशान हैदर हे सुद्धा तिहाड जेलमध्ये बंद आहेत.

आत्मघातकी हल्ल्यासाठी तरुणांना करत होता तयार

एटीएसच्या एसपी विजया लक्ष्मी यांनी सांगितले की, मोहम्मद कलीमुद्दीन हा दहशतवादी संघटना अल-कायदासाठी काम करत होता. भारतामध्ये आत्मघातकी हल्ला करण्यासाठी तो तरुणांना तयार करत असे. तरुणांचं ब्रेनवॉश करुन आत्मघातकी हल्ल्यासाठी तरुणांना तयार करुन दहशतवादी प्रशिक्षणासाठी त्यांना देशाबाहेर पाठवले जात असे. कलीमुद्दीन याने आतापर्यंत शेकडो तरुणांना पाकिस्तानातील प्रशिक्षण शिबिरात पाठवलं आहे.

एटीएस टीमचं अभिनंदन

दहशतवादी मोहम्मद कलीमुद्दीन मुजाहिरी याला अटक केल्यानंतर झारखंडचे पोलीस महानिरीक्षकांनी झारखंड एटीएसच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, दहशतवादी कलीमुद्दीन मुजाहिरी याला अटक केल्यामुळे नक्कीच झारखंडमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांवर आता लगाम लागेल तसेच झारखंड पोलिसांची पकड आणखीन मजबूत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी