जम्मू काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकांची दहशतवाद्यांकडून हत्या, घरात घुसून गोळीबार

जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता (Corporator Rakesh Pandita) यांची दहशतवाद्यांनी (Terrorists)  गोळ्या झाडून हत्या केली.

Terrorists kill BJP corporators in Jammu and Kashmir
जम्मू काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकांची दहशतवाद्यांकडून हत्या  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राकेश पंडिता हे त्राल परिसरातील भाजपचे मोठे नेते होते.
  • राकेश पंडिता जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा काम करत होते.
  • राकेश पंडिता यांना पोलिसांनी सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा दिला होता.

श्रीनगर : जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता (Corporator Rakesh Pandita) यांची दहशतवाद्यांनी (Terrorists)  गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील त्राल (Tral) चे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. राकेश पंडिता हे या परिसरातील भाजपचे मोठे नेते होते. (Terrorists kill BJP corporators in Jammu and Kashmir )

दरम्यान या हल्ल्यात शेजाऱ्यांची मुलगीही जखमी झाली आहे. मृत भाजप नेते राकेश पंडिता जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा काम करत होते. पक्षात तरुणांना सामील करुन घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते राकेश पंडिता हे मुलगा ब्रज नाथसोबत काही कामाच्या निमित्ताने शेजारी राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांच्या घरी गेले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

दहशतवादी घरात घुसले आणि राकेश पंडिता यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत आसिफा मुश्ताक या तरुणीलाही गोळ्या लागली. आसिफा ही मुश्ताक अहमद यांची मुलगी आहे. दोघांना गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान राकेश पंडिता यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक सैन्यासह घटनास्थळी दाखल झालं आणि संपूर्ण परिसराला वेढा दिला. शोधमोहीम सुरु करण्यात आली परंतु हल्लेखोर दहशतवाद्यांचा कोणताही पुरावा सापडला नाही. 

उपराज्यपालांकडून दु:ख व्यक्त

या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, "त्रालमधील नगरसेवक राकेश पंडिता यांच्या हत्येची बातमी ऐकून दु:ख झालं. मी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राकेश पंडिता यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतो."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी