IRCTC Tour Package : स्वस्तात मस्त थायलंडची सहल, IRCTC चं शानदार पॅकेज घालतंय पर्यटकांना भुरळ

थायलंड हे भारतीयांच्या आवडीचं पर्यटनस्थळ. दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक थायलंडमध्ये दाखल होत असतात. आयआरसीटीसीनं थायलंड सहलीसाठी खास पॅकेज जाहीर केलं आहे.

IRCTC Tour Package
IRCTC च्या पॅकेजसह करा थायलंडची स्वस्तात सहल  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • थायलंडसाठी आयआरसीटीसीचं नवं पॅकेज
  • स्वस्तात थायलंडची सफर करण्याची संधी
  • वेबसाईटवरून करता येणार बुकिंग

IRCTC Tour Package | थायलंड हे भारतीय पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं शहर आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा काळ सोडला, तर नेहमीच भारतीय पर्यटकांचा ओढा थायलंडकडे राहिला आहे. भारताच्या जवळ असणारं आणि तुलनेनं स्वस्त असणारं हे ठिकाण भारतीयांसाठी सोयीचं आणि पसंतीचं ठरत आहे. दरवर्षी लाखो पर्यटकांच्या आवडीचं ठरणारं हे ठिकाण पाहण्यासाठी आता IRCTC नं एक आकर्षक पॅकेज जाहीर केलं आहे. जर तुम्हाला थायलंड पाहण्याची इच्छा असेल, तर या पॅकेजचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. 

भारतीयांची थायलंडला पसंती

कोरोनापूर्व काळाचा विचार करता दरवर्षी लाखो भारतीय थायलंडला पर्यटनासाठी जाऊन आल्याची नोंद आहे. 2019 साली 20 लाख पर्यटक भारतातून थायलंडची सैर करून आले होते. या आकड्यावरून भारतीयांचं थायलंडवर किती प्रेम आहे, याची कल्पना येऊ शकेल. जर तुम्हालाही येत्या ऑगस्ट महिन्यात थायलंडच्या सहलीला जाण्याची इच्छा असेल, तर आयआरसीटीच्या या पॅकेजचा तुम्ही विचार करू शकता. 

काय आहे पॅकेज?

आयआरसीटीसीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर या पॅकेजची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ट्विटरवरही त्याची लिंक देण्यात आली आहे. जर तुम्हाला थायलंडच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल, थाई मसाज आणि विलोभनीय समुद्रकिनारे पाहायचे असतील, तर या पॅकेजचा नक्की फायदा घ्या, असं आयआरसीटीसीनं म्हटलं आहे. हे पॅकेज आहे 6 दिवस आणि 5 रात्रींचं. Thiland Delight ex Imphal असं या पॅकेजचं नाव आहे. या पॅकेजमध्ये विमानप्रवास, कारचा प्रवास, स्थानिक मुक्काम यासह इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. 

अधिक वाचा - Do Aliens Really exist? : खरंच एलियन्स असतात का? नासाच्या प्रमुखांनी दिलं एका शब्दात उत्तर

किती रुपयांचं पॅकेज?

आयआरसीटीचं हे पॅकेज जर एका व्यक्तीसाठी घ्यायचं असेल तर त्यासाठी 53,781 रुपये मोजावे लागलील. जर दोघांसाठी हे पॅकेज बुक करणार असाल तर प्रत्येक व्यक्तीमागे 47,775 रुपयेच द्यावे लागतील. दोनपेक्षा अधिक व्यक्तींसाठीदेखील तेवढेच शुल्क आकारले जाणार आहे. लहान मुलांसाठी वेगळं शुल्क द्यावं लागणार आहे. 

मिळणार या सुविधा

  • मुक्कामासाठी हॉटेलची सोय
  • नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय
  • साइट व्हिजिटसाठी लोकल गाईडची सुविधा
  • प्रत्येक ठिकाणी कॅबची सोय
  • प्रत्येक प्रवाशासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स

असं करा बुकिंग

आयआरसीटीसीच्या ऑफिशिअल बेवसाईटवर जाऊन या पॅकेजचं बुकिंग करता येऊ शकेल. याशिवाय आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र आणि स्थानिक कार्यालयांमध्ये जाऊनही तुम्ही हे पॅकेज बुक करू शकता. या पॅकेजसंबंधी आणि त्याच्या बुकिंगसंबंधी अधिक माहिती आयआरसीटीच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळू शकेल. 

अधिक वाचा - Two time lottery winner : नशीबाचा डबल बार! पहिल्या लॉटरीत कोट्यवधी जिंकणारी तरुणी दुसऱ्यांदाही मालामाल, दोन्ही वेळा घडली ‘ही’ कॉमन गोष्ट

पर्यटनाला उभारी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम झाला होता. सर्व देशांनी पर्यटकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांत कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पुन्हा पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एका पर्यटन उद्योग बहरू लागला असून आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी देण्याचे प्लॅन्स पर्यटकांकडून सुरू झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी