ऑक्सिजनवरून देशातील राजकारण तापलं; विरोधक अन् केंद्र सरकार आमने-सामने

ऑक्सिजन अभावी देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे उत्तर काल केंद्र सरकारने राज्यसभेत दिले.

The country's politics on oxygen
ऑक्सिजनवरून विरोधक अन् केंद्र सरकार आमने-सामने  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस आणि आपकडून केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय
  • आरोग्य राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. - काँग्रेस
  • राज्यांनी खरी आकडेवारी केंद्राला दिली होती का? - संबित पात्रा

नवी दिल्ली : ऑक्सिजन अभावी देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे उत्तर काल केंद्र सरकारने राज्यसभेत दिले. यावरुन आता देशभरात राजकारण तापलं असून विरोधक प्रचंड संतापले आहेत. काँग्रेस आणि आपकडून केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारच्या दाव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली.  

ऑक्सिजनअभावी देशातील प्रत्येक राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण आरोग्य राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव आणण्याचा इशारा काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिला होता. दरम्यान शिवसेनेनेही भाजपवर या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. त्यावर भाजपकडून संबित पात्रा यांनी विरोधकांना  कडक शब्दात उत्तर दिले आहे. 

मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा - संजय राऊत

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला धक्का बसल्याचं विधान केले आहे.  'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्यांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ते सत्य आहे, असेही ते म्हणाले.

'केंद्र सरकारने कोणतीही सक्रियता दाखवली नाही'

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही केंद्र सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, 'मृत्यू यामुळे झाले, कारण, सरकारने ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणाऱ्या टँकरची व्यवस्था केली नाही. मृत्यू यामुळे झाले कारण, एम्पावर्ड ग्रुप आणि संसदीय समितीचा सल्ला कानामागे टाकून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही तयारी केली नाही. रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी कोणतीही सक्रियता दाखवली नाही'. 

राज्यांनी केंद्राला खरी आकडेवारी दिली का ? भाजपचा प्रश्न 

दरम्यान, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपने उत्तर दिले आहे. 'केंद्रानं मृतांचे जे आकडे संसदेत मांडले, ते केंद्राचे नसून राज्यांनी दिलेले आकडे आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची जर अशी तक्रार असेल, की केंद्राने चुकीची आकडेवारी दिली आहे, तर त्या पक्षांनी आधी इतर राज्यांना विचारावं की त्यांनी खरी आकडेवारी केंद्राला दिली होती का?” असा सवाल देखील संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे.

संबित पात्रा यांनी खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की आम्हाला धक्का बसला, पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल तर आम्हाला धक्का बसला आहे, तुम्ही गंभीर विषयांवर केवळ राजकारण करत आहात असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे. 'महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्रात हे सांगितलं आहे की, महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही. ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्याच नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केल्यानंतर त्यावर राज्य सरकारने उत्तर दिले आहे”, असे ते म्हणाले.

“इक्बालसिंह चहल यांनीही हेच सांगितलं”

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील केंद्र सरकारकडून तातडीने ऑक्सिजन पुरवठा झाला असून त्यांना दोष देता येणार नसल्याचं सांगितल्याचं संबित पात्रा यांनी म्हटले. “खुद्द इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे की ऑक्सिजन तुटवडा झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला फोन केला होता. त्यानंतर लागलीच ऑक्सिजन पुरवठा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारवर आरोप करणे चुकीचे ठरेल. राज्यांकडून कदाचित चूक होऊ शकते”, असे संबित पात्रा म्हणाले आहेत.
“केंद्राने मृतांचे जे आकडे संसदेत मांडले, ते केंद्राचे नसून राज्यांनी दिलेले आकडे आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची जर अशी तक्रार असेल, की केंद्राने चुकीची आकडेवारी दिली आहे, तर त्या पक्षांनी आधी इतर राज्यांना विचारावे की त्यांनी खरी आकडेवारी केंद्राला दिली होती का?” असा सवालदेखील संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी