नवी दिल्ली : खऱ्या आयुष्यातील बंटी-बबलीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही लव-इन-रिलेशनशीपमध्ये होते. अलिशानपणे जीवन जगण्यासाठी हे जोडपं वाहने चोरण्याचे काम करायचे. या दाम्पत्याने लाजपत नगर परिसरातील फ्लॅट पाहण्याच्या बहाण्याने एका प्रॉपर्टी डीलरचीच कार पळवली. ही चोरलेली कार त्यांनी थेट आग्र्याला नेली, दरम्यान प्रॉपर्टी डिलरने कार चोरीची पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मोबाईल सर्विलंसवर ठेवून या बंटी-बबलीला अटक केली. डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, पीडित योगेश पाहुजाने कार चोरीच्या संदर्भात एफआयआर दाखल केला होती. तक्रारीत त्याने प्रॉपर्टी डीलर असल्याचे सांगितले होते. दरम्यान पोलिसांनी या चोरांकडून दोन कार जप्त केल्या आहेत. या चोरांनी दुसरी कार चित्रकूट, जयपूर येथून चोरली होती.
2 ऑक्टोबर रोजी, मेहक जैन आणि आरव जैन प्रॉपर्टी डिलरच्या कार्यालयात आले, तेथे त्यांनी त्यांची ओळख पती -पत्नी असल्याची करुन दिली. या लोकांनी नवीन फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. 6 ऑक्टोबरला हे दोघे पुन्हा काही फ्लॅट बघायला आले. प्रॉपर्टी डीलरने त्या लोकांना त्यांच्या ड्रायव्हरसह कारने पाठवले. वाटेत मेहकने उलटी करण्याचे नाटक केले आणि चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. चालकाने गाडी थांबवली आणि तो खाली उतरला. चालक गाडी खाली उतरताच ते दोघेही कारसह घटनास्थळावरून पळून गेले. लाजपत नगर एसीपी मनोज सिन्हा यांच्या देखरेखीखाली पोलिसांच्या पथकाने तांत्रिक पाळत ठेवण्याच्या आधारे तपास सुरू केला. पहाडगंज येथील एका हॉटेलमध्ये ते राहत असल्याची माहिती मिळाली.
दक्षिण-पूर्व दिल्ली पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कासिम खान आणि मेहक जैन यांचा समावेश आहे. दोघेही आग्राचे रहिवासी आहेत. 25 वर्षीय कासिम आपली ओळख लपवण्यासाठी आरव जैन बनला होता. कासीमने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि वेल्डिंगचे काम करतो. आरोपी मुलगी ही 21 वर्षाची असून तिचे नाव मेहक आहे, ती आग्राच्या सिव्हिल लाईन्सची रहिवासी आहे. ती पदवीधर आहे आणि एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते.
पोलिसांना मेहकचा मोबाईल नंबर मिळाला. जेव्हा तो नंबर पाळत ठेवण्यात आला तेव्हा त्याचे स्थान आग्रा येथे असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने आग्रा येथे छापा टाकून त्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीची कार जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून आणखी एक चोरीची कार जप्त करण्यात आली, जी जयपूरच्या चित्रकूटमधून चोरी केली होती.
दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. आलिशान जीवनशैली जगण्यासाठी ते चोरी करायचे. जलद पैसे कमवण्याच्या आणि अल्पावधीत आलिशान जीवन जगण्याच्या इच्छेत त्याने वाहने चोरण्यास सुरुवात केली. आरोपी काशिम खानने ओळख लपविण्यासाठी आपले नाव आरव जैन असे बदलले. कासीम लाजपत नगरमध्ये प्रॉपर्टी डीलरकडून चोरलेली कार विकण्यासाठी ग्राहक शोधत होता.