पूर्व लडाखमधील वादावर आज 13 वी बैठक; एलएसीवरुन एक इंचही मागे हटणार नाही, लष्कर प्रमुख नरवणेंकडून भूमिका स्पष्ट

एलएसीवरुन एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका लष्करप्रमुख मनोज. एम. नरवणे (Army Chief Manoj. M. Narvane) यांनी स्पष्ट केली आहे.

Thirteenth meeting today on the dispute in East Ladakh
पूर्व लडाखमधील वादावर आज 13 वी बैठक  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • चीनमधील सरकारी पत्रकारांनी गलवान खोऱ्यातील हिंसेत ताब्यात घेतलेल्या भारतीय सैनिकांचे फोटो जारी केले आहेत.
  • पूर्व लडाखमधील सैन्य माघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची 13 वी फेरी होणार
  • देपसांग आणि डेमचोक येथून चीनने सैन्य माघारी घ्यावे यासाठी आग्रह धरण्यात येत आहे.

नवी दिल्ली : एलएसीवरुन एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका लष्करप्रमुख मनोज. एम. नरवणे (Army Chief Manoj. M. Narvane) यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान आज रविवारी भारत (India) आणि चीन (China) यांच्यात पूर्व लडाखमधील (East Ladakh) सैन्य माघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची 13 वी फेरी होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पूर्व लडाखमध्ये चीनच्या बाजूला असलेल्या मोल्दो येथे ही चर्चा होईल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवरील तणाव संपवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर 13व्या फेरीची बैठक आज होणार आहे. ही बैठक पीएलए सैन्याच्या मोल्दो येथे होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखच्या गरम पाण्याच्या झऱ्यापासून मागे हटण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.  एलएसीवरील सैन्यमाघारीची प्रक्रिया वेगाने व्हावी, अशी भारताची अपेक्षा असून देपसांग आणि डेमचोक येथून चीनने सैन्य माघारी घ्यावे यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. 31 जुलै रोजी चर्चेच्या बाराव्या फेरीत गोगरा येथून सैन्य माघारीच्या मुद्द्यावर यश आले होते. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही माघार महत्त्वाची होती. 

12 फेऱ्यांच्या बैठकीदरम्यान, पूर्व लडाखला लागून असलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) फिंगर एरिया, कैलाश हिल रेंज आणि गोगरा भागात विघटन करण्यात आले आहे. पण हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर अजूनही तणाव कायम आहे.

चीनची नवी कुरापत 

अरुणाचल प्रदेशजवळ असलेल्या एलएसी (LAC) वर चिनी सैनिकांना बंदी केल्याचे वृत्त मिळाल्यानंतर चीनमधील सरकारी पत्रकारांनी गलवान खोऱ्यातील हिंसेत ताब्यात घेतलेल्या भारतीय सैनिकांचे फोटो जारी केले आहेत. या फोटोंमध्ये चिनी सैन्याच्या ताब्यात भारतीय सैनिक आणि त्यांची हत्यारे दिसत आहेत. 
दरम्यान, गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशातील यांगत्सेमध्ये चीनजवळ 200 सैनिकांनी एसएसीचे उल्लंघन केले होते. यादरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये फेसऑफ म्हणजेच, वाद निर्माण झाला होता.

या संदर्भात काल म्हणजेच शुक्रवारी, वृत्त आले की, या दरम्यान भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना ओलीस ठेवले आहे. तसेच, दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सच्या फ्लॅग मिटिंगनंतरच त्यांची सुटका झाली होती. या घटनेनंतर चीनच्या काही सरकारी पत्रकारांनी गलवान खोऱ्यातील हिंसेच्या तब्बल 16 महिन्यांनंतर फोटो सोशल मीडियावर जारी केले आहेत. तसेच गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर चिनी सैन्यानं त्या युद्धात भारतीय सैनिकांना ओलिस ठेवलं होतं, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

गलवान खोऱ्यातील हिंसाचारात दोन्ही देशांच्या सैनिकांनी समोरील देशाच्या सैनिकांना ओलिस ठेवलं होतं. त्यानंतर लष्करी कमांडर्समध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या सैनिकांना सोडून दिले होते. दरम्यान, भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचेही सैनिक यामध्ये मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी