नवी दिल्ली: 'आजपर्यंत हे लोकं आपलं कॅबिनेट बनवू शकलेले नाहीत. हे सरकार जे बनलं आहे दोघांचं.. वासू-सपना.. एक दुजे के लिए.. हे लोकं आता आपर्यंत आपलं मंत्रिमंडळ बनवू शकलेले आहेत.' अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Govt) केली आहे. शिवसेनेचे (ShivSena) १२ खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असं वृत्त काही वेळापूर्वी समोर आलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ राजधानी दिल्लीत शिवसेनेच्या काही खासदारांसह एक पत्रकार परिषद घेतली आणि या वृत्ताचं खंडन केलं.
फुटीर गट फक्त भीतीपोटी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. या संपूर्ण पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
'आता दिल्लीत कॉमेडी सीझन २ सुरु आहे'
'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा झाली. हे जेव्हा वृत्त आलं आपल्या माध्यमातून की, लोकसभेतील गटनेते विनायक राऊत, खासदार राजन विचारे जे मुख्य प्रतोद आहेत, त्यानंतर आमचे अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी हे ताबडतोब माझ्याकडे आले. जे काही वृत्त माध्यमातून दाखविण्यात आलं की, हा जो काही प्रकार आहे तो कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे.'
अधिक वाचा: 'फडणवीस,शिंदेंसारखी ढोंगी लोकं नाहीत', राऊतांची घणाघाती टीका
'कॉमेडी सीझन १ हा विधिमंडळात झाला आहे. ज्याबाबत २० तारखेला न्यायालयात सुनावणी सुरु होत आहे. या देशाचे जे सरन्यायाधीश आहे. त्यांनी जे खंडपीठ स्थापन केलं आहे त्यांच्यासमोर फुटीर गटातील भवितव्यासंदर्भातील निर्णय लागेल.'
'आम्हाला खात्री आहे ज्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जी याचिका शिवसेनेची आहे ती कायद्याच्या नियमाच्या आधारावर पक्की आहे. जो न्याय मिळायचा आहे तो आम्हाला न्यायालयात मिळेल. त्या भयातून आज त्यांनी घाईघाईने गटाने.. एक गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी बरखास्त करु शकतो? तो फुटीर गट आहे. त्या गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही.' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
'भीतीपोटी लोकांमध्ये भ्रम पसरवत आहेत'
'तो फुटीर गट बाळासाहेबांच्या ५६ वर्षाच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो आणि स्वत:ची कार्यकारिणी जाहीर करतो. लोकं हसतायेत, लोकं मजा घेतायेत. स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी, स्वत:चे आमदार सांभाळण्यासाठी फुटून गेलेले ही धडपड सुरु आहे. पण शिवसेना जे सोडून गेले आहेत त्यांच्याशिवाय भक्कमपणे उभी आहे. ती अधिक भक्कम होईल.'
अधिक वाचा: फडणवीस सतत अपमान करतात मुख्यमंत्र्यांचा: सुप्रिया सुळे
'शिवसेनेचं नेते मंडळ हे बाळासाहेब ठाकरे यांनी आणि कार्यकारिणी निर्माण केलं आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले गेलेले आहेत. शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. शिवेसना हा गट नाही. ही मूळ शिवेसना आहे.'
'अनेकांनी बाहेर जाऊन पक्ष निर्माण केले असतील. त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे जनतेला त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना भ्रमित करण्यासाठी हे सगळे प्रकार सुरु आहे. त्याचा शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही. भ्रम निर्माण, राजकीय गोंधळ निर्माण करुन आपल्या गटातील लोक थांबविण्यासाठी फुटीर गटाची अखरेची धडपड सुरु आहे. ' असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
'या देशातील न्याय अद्याप मेलेला नाही'
'आम्ही मुख्य प्रतोद पदी केलेली राजन विचारे यांची नेमणूक ही कायद्याच्या आधारेवर केलेली आहे. तेच मुख्य प्रतोद आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जी १६ नावं दिली आहेत अपात्रतेसाठी त्यापैकी पहिलं नाव हे त्यांचं आहे त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथच मुळी बेकायदेशीर आहे.'
अधिक वाचा: 'शिंदे-फडणवीसांची राज्य चालवण्याची कुवत राऊतांना माहितीए'
'शिवसेनेला खात्री आहे की, या देशातील न्याय अद्याप मेलेला नाही. सर्वोच्च न्यायलयात फक्त न्याय होईल. त्यामुळे त्यांच्याकडून खासदार फुटणार म्हणून जे आकडे दिले जात आहेत ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी दिले जात आहेत. ही फसवाफसवी आहे.'
'शिवसेनेचे खासदार जे इथे आहेत ते इथेच असतील. फुटीर गटाबरोबर कोणी बैठक घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे सगळं खोटेपणाच्या पायावर उभं आहे. एक फुटीर गट मूळ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कशी करु शकतो?' असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
'हे तर वासू-सपनाचं सरकार..'
'मुख्यमंत्र्यांना दिल्लीत का यावं लागतंय? शिवसेनेचे मुख्यमंत्री दिल्लीत नव्हते आली कधी. आमचं हायकमांड मुंबईत आहे शिवसेनेचं. भाजपसोबत जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हाही आम्ही दिल्लीत कधी आलो नव्हतो.'
अधिक वाचा: महाराष्ट्रातील आणखी आमदार फुटणार, शिंदे गटात सहभागी होणार?
'दुसरी गोष्ट ही आहे की, आजपर्यंत हे लोकं आपलं कॅबिनेट बनवू शकलेले नाहीत. आज सोळा दिवस झाले शपथ घेऊन पण या भीतीमुळे की, सुप्रीम कोर्टात काय होईल. आपण टिकू शकू की नाही. त्या भीतीमुळे हे सरकार जे बनलं आहे दोघांचं.. वासू-सपना.. एक दुजे के लिए.. हे लोकं आता आपर्यंत आपलं मंत्रिमंडळ बनवू शकलेले आहेत. ज्या सोळा लोकांबाबत जी याचिका आहे त्यापैकी एकानेही शपथ घेतली तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे सरकार चालू शकणार. खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. जिथे ठाकरे तिथे शिवसेना.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या बोचऱ्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच सुप्रीम कोर्टा या सगळ्या राजकीय पेचाबाबत नेमका काय निर्णय देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कोर्टाचा जो काही निकाल असेल तो यापुढे दिशादर्शक असणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.