Terrorist: अफगाणिस्तानात ३०० दहशतवादी घेतायत ट्रेनिंग; दोन देशांना मोठा धोका

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 07, 2019 | 23:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Terrorist: गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे समर्थन असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये ट्रेनिंग घेत आहेत. याचा भारतासह अमेरिकेलाही धोका आहे.

Terrorist
पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात ट्रेनिंग  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील भारतीय दुतावास सध्या हाय अलर्टवर आहे. गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे समर्थन असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये ट्रेनिंग घेत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अजूनही दहशतवादी कॅम्प सुरू आहेत. त्यात कुनार, नानगरह, नुरिस्तान आणि कंधारमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ट्रेनिंग घेत आहेत. हे दहशतवादी पाकिस्तानातील असून, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही दहशतवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी भारताच्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. भारतात काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान मृत्यूमुखी पडले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. भारताच्या मिराज या लढाऊ विमानांनी बालाकोटच्या मानशेरामध्ये एअर स्ट्राईक केला होता.

पाकिस्तानी दहशतवाद्यांची तालिबानशी हातमिळवणी

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या एका रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या दोन दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानात तालिबानशी हातमिळवणी केली आहे. तालिबानकडून ट्रेनिंग घेण्यासाठी ही हातमिळवणी करण्यात आली आहे. पाकिस्तानात सरकारकडून दहशतवादी संघटनांवर अंकूश लावण्याचे काम सुरू आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पंतप्रधान इमरान खान यांनी जवळपास १५ लष्कर-ए-तोयबाचे नेते आणि दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्या अनेक चॅरिटी संस्थांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यावर भारताने समाधान व्यक्त केलेले नाही. भारताला अजूनही मोठ्या कारवाईची अपेक्षा आहे.

अफगाणिस्तानात ट्रेनिंग

भारतीय गुप्तचर संस्थांनी मिळवलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात ब्लॅक लिस्ट केल्या जाण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी पाकिस्तानची सीमा ओलांडून अफगाणिस्तानात प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानची राजधानी कंधारमध्ये भारतीय दुतावासावर हल्ला करण्याची धमकीही देण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी मिळवली आहे. जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी मोठ्या संख्येने सध्या अफगाणिस्तानात पसरले आहेत. छोट्या छोट्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मसूद अझहरला आश्रय

गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार, यावर्षी फेब्रुवारी माहिन्यात तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आश्रय दिला होता. पण, त्यानंतर त्याला पुन्हा पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. लष्कर-ए-तोयबा समूहानं नानगरहर, नुरिस्तान, कुनार हेलमंड आणि कंधारमध्ये ट्रेनिंग सेंटर स्थापन केले आहेत. सध्या अफगाणिस्तानात ३०० हून अधिक दहशतवादी आहेत. जे केवळ भारतच नव्हे, तर अमेरिकेसाठीही धोकादायक ठरू शकतात, असे पेंटागॉनच्या अहवालात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी